नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीलाच हिंदीत शेर ऐकवला. ''यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है'', असे म्हणत अर्थसंकल्प सादरीकरणाला सुरुवात केली. भारतीय अर्थव्यवस्थेतेतील सकारात्मक बदल आणि देशाचा आर्थिक विकास याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सितारमण यांनी सभागृहात भाषणाला सुरुवात केली. मोदी सरकार 2.0 च्या अर्थसंकल्पात देशातील दुष्काळी परिस्थीती लक्षात घेता स्वतंत्र जलमंत्रालयाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 2024 पर्यंत 'हर घर जल' अशी योजना आखण्यात आली आहे.
देशातील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचविणे ही सरकारी प्राथमिकता आहे. जल जीवन योजनेंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात पाणी पोहचविण्याचं लक्ष्य असल्याचं अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले. देशातील 256 जिल्ह्यांमध्ये ही जलशक्ती योजना कार्यरत असणार आहे. जल जीवन योजनेसाठी सरकारकडून पाण्याची साठवण आणि पुरवठा याबाबतच्या कामाला प्राधान्य देण्यात येईल. त्यासाठी सरकारने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना केली असून पाण्याची पूर्तता करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी 1500 ब्लॉकची पाहणी करण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लातूर जिल्ह्यातील औसा येथील प्रचारसभेत सर्वप्रथम सरकार जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार असल्याचे म्हटले होते. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि लातूरला पाठविण्यात आलेले रेल्वेने पाणी ही गंभीर बाब लक्षात घेऊन मोदींनी लातूर येथील सभेत याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर, आज अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सितारमण यांनीही हर घर जल योजनेसंदर्भात माहिती दिली.