- उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउण्टण्ट अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण १ फ्रेब्रुवारीला लोकसभेत सादर करतील. प्रत्येकाचा अर्थसंकल्प असावा असे म्हणतात, ते का?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्थसंकल्प म्हणजे पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजित उत्पन्न व खर्च यांचे बनविलेले पत्रक. घरापासून ते देशापर्यंत, नफा कमविणारे व्यवसाय करणाऱ्यापासून ते ना-नफा तत्त्वावरील समाजसेवी संस्थांपर्यंत सर्वच अर्थसंकल्प तयार करतात. अर्थसंकल्पाचे प्रामुख्याने तीन प्रकार : कुटुंबाचा अर्थसंकल्प, व्यवसायाचा अर्थसंकल्प आणि देशाचा/राज्याचा अर्थसंकल्पअर्जुन : कुटुंबाचा अर्थसंकल्प का बनवावा?कृष्ण : सध्या पुरुष व स्त्री दोघेही अर्थार्जन करतात. प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन खर्च, आकस्मिक खर्चासाठी नियोजन, घरामध्ये मोठी वस्तू घेण्यासाठीचा खर्च, मुलांचा खर्च, गुंतवणूक, विमा- ईएमआय इ. खर्चाची तरतूद व नियोजन करावे लागते. हॉटेलिंग, आरोग्यावरील खर्च, आकस्मिक अपघात यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक नियोजनाची खूप मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक कुटुंबाने आपल्या राहणीमानाप्रमाणे उत्पन्नाच्या स्रोतानुसार व खर्चाच्या अनुमानाचा वेध घेऊन कुटुंबाचा अर्थसंकल्प बनवायला हवा. त्या अनुसारच पुढील महिन्याच्या बजेटमध्ये फेरफार करावा. यामुळे उत्पन्न व खर्च याचा समतोल राखता येऊ शकेल आणि आपलं आयुष्य सुखकर होईल.अर्जुन : व्यवसायासाठीच्या अर्थसंकल्पाचे काय महत्त्व आहे? कृष्ण : व्यवसायात प्रगती करावयाची असेल, तर त्यासाठी ‘टार्गेटस्’ ठरवावी लागतात व ती साध्य करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतात. पुढील वर्षासाठी अंदाजित बजेट तयार करवून घ्यावे लागते. छोटे दुकानदार किंवा व्यावसायिक पुढील वर्षाचे बजेट तयार करून आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी उपाययोजना करू शकतात, तसेच खर्चावर नियंत्रणही ठेवू शकतात. अर्जुन : यामधून काय बोध घ्यावा? कृष्ण : बजेटमध्ये राहणे म्हणजेच संतुलित जीवन जगणे! प्रत्येकाने कुवतीनुसारच पैसा खर्च करावा. उत्पन्न पाहूनच संसार वा व्यवसाय चालवावा. कर्जाचे प्रमाण सीमितच ठेवावे; अन्यथा आर्थिक कटकटी होतील.
निर्मलाबाई तयारीला लागल्या, तुम्ही?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 5:06 AM