नवी दिल्ली- पंजाब नॅशनल बँके(PNB)च्या माध्यमातून देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा करणारा आरोपी नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नीरव मोदीची 4 देशांतील 637 कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. अंमलबजावणी संचलनालयानं न्यूयॉर्क, लंडन, सिंगापूर, मुंबईतल्या संपत्तीवर टाच आणली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंध कायद्यांतर्गत ईडीनं अमेरिकेतील न्यूयॉर्कमधल्या नीरव मोदीची 216 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये नीरव मोदीची मालमत्ता आणि बँक अकाऊंट्सचाही समावेश आहे.
कोण आहे नीरव मोदी ?
नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. त्याला 'नीरव मोदी डायमंड ब्रँड' या नावाने भारतासह जगभरात ज्वेलरी शोरुम सुरू केली आहेत. दिल्ली, मुंबईपासून ते लंडन, हाँगकाँग आणि न्यूयॉर्कपर्यंत नीरव मोदींची 25 स्टोअर्स आहेत. नीरव मोदी यांच्या ज्वेलरीची किंमत 10 लाखांपासून 50 कोटी रुपयांपर्यंत आहे. केट विंसलेट आणि डकोटा जॉनसन यांच्यासारख्या हॉलिवूड अभिनेत्री नीरव मोदींच्या ज्वेलरीच्या ग्राहक आहेत. 47 वर्षीय नीरवचे वडीलदेखील हिरेव्यापारीच होते. नीरव वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला. नीरवला भारतातील 'डायमंड किंग' असंही संबोधलं जातं. नीरव मोदी फोर्ब्ज या जगभरातील श्रीमंतांच्या यादीत 84 व्या स्थानावर आहे. फोर्ब्जच्या आकडेवारीनुसार नीरव मोदी यांची जवळपास 12 हजार कोटींची संपत्ती आहे.
काय आहे प्रकरण ?
सार्वजनिक क्षेत्रातील दुस-या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेत 11,500 कोटी रुपयांचा महाघोटाळा समोर आला आहे. घोटाळ्यात संशयित असलेले बडे व प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी व अन्य तिघे देश सोडून फरार झाला. पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील ब्रिच कँडी शाखेत हा घोटाळा झाल्याचे काल उघड झाले. हिरे व्यापारी नीरव मोदीने आपल्या मित्रांच्या सहाय्यानं पँजाब नॅशनल बँकेला हा गंडा घातल्याचा आरोप आहे. घोटाळ्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या सक्तवसुली संचलनालयाने याप्रकरणी घोटाळ्याचा सूत्रधार आणि प्रतिष्ठित हिरे व्यावसायिक नीरव मोदी याच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू केली होती.
Enforcement Directorate attaches attaches properties and bank accounts to the tune of Rs 637 crore in Nirav Modi case. pic.twitter.com/Gsz6MFWq4O
— ANI (@ANI) October 1, 2018