फ्रेन्च कार निर्माता कंपनी रेनो आणि जपानची कार उत्पादक कंपनी निस्सान यांनी येत्या १५ वर्षांत देशात ६० कोटी डॉलर्स म्हणजेच ५,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही कंपन्यांनी यासाठी तामिळनाडू सरकारसोबत करार केला आहे. या नवीन प्रकल्पांतर्गत कार लाइनअपचा विस्तार केला जाईल आणि त्यासोबतच नवीन नोकऱ्याही निर्माण केल्या जातील. “दोन्ही कंपन्या सहा नवीन मॉडेल्स लाँच करतील. यामध्ये दोन इलेक्ट्रीक मॉडेल्सचाही समावेश आहे,” अशी प्रतिक्रिया नवीन गुंतवणुकीची घोषणा करताना, निस्सान मोटरचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) आणि अलायन्स बोर्ड सदस्य अश्वनी गुप्ता यांनी दिली.
सध्या, दोन्ही कंपन्या येथून ४५ किमी अंतरावर असलेल्या ओरागडम येथील त्यांच्या चेन्नई प्रकल्पात चार मॉडेल्सचं उत्पादन करतात. गुप्ता म्हणाले की, रेनो-निस्सानचा उत्पादन कारखाना २०२५ पर्यंत कार्बन न्यूट्रल असेल. येथे केवळ रिन्यूएबल एनर्जीचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मिळणार नवे जॉब्सया गुंतवणुकीमुळे चेन्नईतील रेनो निस्सान टेक्नॉलॉजी आणि बिझनेस सेंटरमध्ये २ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसंच याअंतर्गत २०४५ पर्यंत प्रकल्प कार्बनमुक्त करण्यात येणार आहे.
६ मॉडेल्स उतरवणारसहा नवीन मॉडेल्समध्ये दोन्ही कंपन्यांच्या प्रत्येकी तीन मॉडेल्सचा समावेश असेल. या सर्वांचे इंजिनियरिंग आणि निर्मिती चेन्नईमध्ये केली जाईल. यामध्ये चार SUV आणि दोन इलेक्ट्रीक कार्सचा समावेश असेल. "नवीन मॉडेल्स केवळ भारतीय ग्राहकांसाठी नसतील तर भारतातून निर्यात वाढवली जाईल,” असे कंपन्यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.