Mukesh Ambani Networth: देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासह त्यांच्या पत्नी नीता अंबानी(Neeta Ambani), यादेखील नेहमी चर्चेत असतात. रिलायन्स उद्योग समूह वाढवण्यात नीता अंबानी यांचाही मोलाचा वाटा आहे. व्यवसायासोबत नीता अंबानी समाजसेवेतही अग्रेसर असतात. दरम्यान, आशियातील सर्वात मोठ्या उद्योग समुहाच्या प्रमुख पदावर असलेल्या नीता यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षिका म्हणून केली होती, हे फार कमी लोकांना माहिती आहे. विशेष म्हणजे, लग्नानंतरही त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले होते.
नीता आणि मुकेश यांचे 1985 मध्ये लग्न झाले
सिमी ग्रेवालच्या शो-मध्ये नीता आणि मुकेश अंबानी आले होते, त्यांच्यातील संभाषणाचा एक भाग सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीत नीता अंबानी यांनी सांगितले होते की, लग्नानंतर एका वर्षातच त्यांनी सनफ्लॉवर नर्सरीमध्ये शिकवायला सुरुवात केली होती. यासाठी त्यांना दरमहा 800 रुपये मिळायचे. प्रचंड श्रीमंत घराण्याची सून शाळेत शिकवतीये, हे पाहून अनेकजण त्यांच्यावर हसायचे, पण नीती यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. यातून नीता यांना आनंद मिळायचा. यावर मुकेश अंबानी म्हणाले की, नीताची संपूर्ण पगार आमची होती. या पैशातून आम्ही दोघे फिरायला, जेवायला जायचो.
साल 2000 मध्ये नीता आणि मुकेश अंबानी यांनी सिमी ग्रेवालच्या शो-मध्ये हजेरी लावली होती. हा जुना व्हिडिओ आता नव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेअर केल्यापासून आतापर्यंत 40 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय. तसेच, या व्हिडिओवर युजर्स विविध प्रतिक्रियाही देत आहेत.