ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - पायाभूत सुविधांचा विस्तार जबरदस्त वेगाने करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी यासाठी बजेटमध्ये असलेली तरतूद दुप्पट करून 85000 कोटी करावी अशी मागणी केली आहे. दर दिवशी 30 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा मानस गडकरींनी व्यक्त केला आहे. त्यासाठी 2016 - 17 या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये 85 हजार कोटींची तरतूद असावी अशी मागणी गडकरी यांनी केली आहे. विशेषत: महामार्गांचे प्रस्ताव जलदगतीने पूर्ण करण्याचा रस्ते वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे.
गेल्या वर्षी या महामार्गांसाठी असलेली तरतूद 48 टक्क्यांनी वाढवून 42,913 कोटी रुपये करण्यात आली होती. विशेष म्हणजे या खात्याने त्यातील 80 टक्के रक्कम खर्चही केली असून उरलेली रक्कम 31 मार्चपूर्वी खर्च करण्यात येईल असे खात्यातर्फे सांगण्यात आले.
सुरक्षित महामार्ग अशी संकल्पना रस्ते व महामार्ग खात्याकडून आखण्यात येत असून त्यासाठी 11 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरवर्षी देशातील रस्त्यांवर पाच लाख अपघात होतात, जी अत्यंत चिंतेची बाब आहे. अपघातांची संख्या घटवण्यासाठी येत्या पाच वर्षांमध्ये 11 हजार कोटी रुपयांचा खर्च करण्याची अपेक्षा आहे.
रस्त्यांवरील अपघातांमुळे वर्षाला 55 ते 60 हजार कोटी रुपयांचे नुकसान होते, जे जीडीपीच्या 3 टक्के आहे आणि यामध्ये 22 ते 33 या वयोगटातील तरुणांची प्राणहानी होते. देशामधल्या अशा 726 अपघातप्रवण जागा शोधण्यात आल्या असून त्या अपघातमुक्त करण्याचा प्रयत्न आहे असे गडकरी यांनी सांगितले. देशामधली 30 टक्के ड्रायव्हिंग लायसन्स बनावट असून ऑटोमेटेड ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचीही गडकरी यांची योजना आहे.