नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. आजचा दिवस ऐतिहासिक असून मी खूप खुश असल्याचे गडकरींनी सांगितले. शुक्रवारी गडकरी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मधील InvIT NCD च्या लिस्टिंगवेळी बोलत होते. देशातील सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात गुंतवणुकीची संधी देण्यासाठी सरकारने InvIT NCD आणले आहे. यामध्ये 25 टक्के नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCD) रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
नितीन गडकरींनी केलं ट्विट
नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) InvIT NCDs यामध्ये तुम्हाला बँकांपेक्षा 8.05 टक्क्यांपर्यंत जास्त परतावा मिळतो आणि किमान गुंतवणुकीची मर्यादा केवळ 10,000 रुपये एवढी आहे. नितीन गडकरी यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "आज ऐतिहासिक दिवस आहे आणि मला खूप आनंद होत आहे की, आम्ही किरकोळ गुंतवणूकदारांना (निवृत्त नागरिक, पगारदार व्यक्ती, लहान आणि मध्यम व्यावसायिक मालक) राष्ट्र उभारणी उपक्रमात सहभागी होण्याची संधी देऊ शकलो आहोत."
InvIT चा दुसरा राउंड उघडल्याच्या अवघ्या 7 तासांत जवळपास 7 वेळा ओव्हरसबस्क्राइब केले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर InvIT NCDs ची लिस्टिंग ऐतिहासिक आहे, कारण ते इन्फ्रा फंडिंगमध्ये लोकांच्या भागीदारीसाठी एक चांगली आशा आहे. आता सामान्य गुंतवणूकदारही इन्फ्रा फंडात पैसे गुंतवू शकतील. दरवर्षी किमान 8.05 टक्के परतावा मिळवण्याची ही उत्तम संधी आहे, असेही गडकरींनी सांगितले.
Today is a historic day and I feel very happy that we could finally give the Retail Investors (retired citizens, salaried individuals, small and medium business owners) an opportunity to participate in the Nation-Building activity. The minimum investment slab is just Rs 10,000/-. pic.twitter.com/Sf2W0YWMZK
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 28, 2022
सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वाचे -
नितीन गडकरींनी आणखी सांगितले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी InvIT बाँड्स ही एक चांगली संधी आहे. आपल्या देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी पायाभूत सुविधा खासकरून रस्त्यांमध्ये मोठी गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि मला खात्री आहे की आणखी गुंतवणूकदार यामध्ये सहभागी होतील."
गडकरींनी जुन्या आठवणींना दिला उजाळा
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजला पोहोचले आणि NHAI Invit ची लिस्टिंग केली. यादरम्यान एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरींनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मधील त्यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, मुंबईतील महामार्गाच्या बांधकामासाठी बाँडद्वारे पैसे कसे उभे केले, त्यावेळी धीरूभाई अंबानी आणि रतन टाटा या दिग्गजांनीही त्यांचे कौतुक केले आणि तुम्ही आमच्यापेक्षाही हुशार निघालात असे त्यांनी म्हटले होते. याशिवाय अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासमोरही अंबानींनी गडकरींचे कौतुक केले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"