आपण एखादे दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा. आपली ही प्रतीक्षा आपल्याला बंपर फायदा मिळवून देईल. कारण, एका वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती (Electric Vehicle) पेट्रोल कारच्या किमतीएवढ्या होतील, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी म्हटले आहे, ते शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलत होते.
पेट्रोल-डिझेलची किंमतही कमी होणार - एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून मोदी सरकार पिकांच्या अवशेषांपासून इथेनॉल तयार करण्यावर भर देत आहे. यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होतील.
कारच्या किंमतीत 35 ते 40 टक्के बॅटरीचा खर्च -गडकरी म्हणाले, एका वर्षाच्या आत देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमत पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या बरोबरीत याव्यात, असा माझा प्रयत्न आहे. यामुळे जीवाश्म इंधन, पेट्रोल, डिझेल इत्यादींवर होणारा आपला खर्च कमी होईल आणि आपण परकीय चलन वाचवू शकू. सध्या बॅटरीच्या किमतीमुळे इलेक्ट्रिक वाहने महाग आहेत. कार कारच्या किमतीत 35 ते 40 टक्के एवढा खर्च बॅटरीवरच होतो.
फोटो काढून पाठवणाऱ्यांना मिळणार 500 रुपये -नितिन गडकरी आणि त्यांचे मंत्रालय सातत्याने परिवहन व्यवस्था सुधारण्यासाठी आणि प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी काम करते. गडकरींनी यांनी नुकतेच, जामची समस्या सोडविण्यासाठी एक मोठी घोषणा केली आहे. यात, जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनाचा फोटो काढून पाठवला, तर त्या व्यक्तीला 500 रुपये बक्षीस दिले जाईल, सरकार लवकरच अशा प्रकारचा एक कायदा आणत आहे, असे गडकरी यांनी म्हटले आहे.