सरकार भारताला एक जागतिक वाहन निर्मिती केंद्र बनविण्याच्या दृष्टीने काम करत आहे. तसेच, थोड्याच दिवसांत देशांतर्गत ऑटोमोबाईल उद्योग 15 लाख कोटी रुपयांचा होईल. सध्या वाहन उद्योगाचे देशाच्या GDP मध्ये 7.1 टक्का योगदान असून या उद्योगाचा आकार 7.8 लाख कोटी रुपये एवढा असल्याचे केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी जयपूर येथील टाटा मोटर्सच्या वाहन स्क्रॅप सुविधेचे उद्घाटन करताना बोलत होते.
वाहन निर्मिती केंद्र -गडकरी म्हणाले, ‘‘वाहन क्षेत्रात हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जवळपास चार कोटी लोकांना रोजगार देते. हा आकडा 2025 पर्यंत पाच कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. मी देशाला जगातील पहिल्या क्रमांकाचे वाहन निर्मिती केंद्र बनविण्याच्या दृष्टीने काम करत आहे. भविष्यात या उद्योगाचा आकार 15 लाख कोटी रुपये होईल.’’
वाहन स्क्रॅपिंग धोरण -गडकरी म्हणाले, वाहन स्क्रॅपिंग धोरणामुळे जुनी वाहने टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आणि कमी प्रदूषण करणारी नवी वाहने आणण्यास मदत मिळाली आहे. या धोरणामुळे, निर्माण होणार्या वाहनांच्या मागणीतून सरकारला 40,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त वस्तू आणि सेवा कर (GST) महसूल मिळेल असा अंदाज आहे. या शिवाय नवीन कारसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील खर्चही 30 टक्क्यांनी कमी होईल.
रोजगाराच्या नव्या संधी - गडकरी म्हणाले, "सध्या भारत वर्षाला 80 लाख टन स्क्रॅप स्टील आयात करतो. पण, जवळपास 50-60 स्कॅप सेंटर्समधून होणारी स्टील स्क्रॅपची आयात कमी होईल आणि भारत या क्षेत्रात अत्मनिर्भर बनेल.’’ तसेच, वाहन स्क्रॅपिंग धोरणामुळे एक संघटित उद्योग उभा राहण्यास मदत होईल आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.