देशातील सर्वात मोठ्या ब्रोकरेज फर्मपैकी एक असलेल्या झिरोदाला (Zerodha) सेबीकडू (SEBI) एएमसीसाठी (AMC) लायसन्स मिळाला आहे. यासह, कंपनीला म्युच्युअल फंड लॉन्च करण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. कंपनीनं याची जबाबदारी विशाल जैन यांच्याकडे सोपवली आहे. झिरोदाचे संस्थापक आणि सीईओ नितीन कामथ यांनी ट्वीट करून ही माहिती दिली.
ही एक असेट मॅनेजमेंट कंपनी झेरोधा ब्रोकिंग लिमिटेड (Zerodha Broking Ltd)आणि वेल्थ मॅनेजमेंट कंपनी स्मॉलकेस (Smallcase) यांचा संयुक्त उपक्रम आहे. एक कोटी गुंतवणूकदारांना आपल्याशी जोडण्याचं आपलं लक्ष्य असल्याचं कामथ म्हणाले. या व्यवसायात कंपनी मुकेश अंबानी यांच्याशी स्पर्धा करेल. रिलायन्स इंडस्ट्रीजनं अलीकडेच आपला आर्थिक व्यवसाय डिमर्ज केला आहे आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने त्याच्या लिस्टिंगची तयारी केलीये. कंपनीनं जगातील सर्वात मोठी असेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉकशी (BlackRock) देखील करार केला आहे.
'आम्हाला झिरोदा एएमसीसाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. आम्ही स्मॉलकॅपसह भागीदारी करत आहोत. म्युच्युअल फंड सुरू करण्याची आमचं मोटिवेशन टू-फोल्ड होतं. भारतीय बाजारपेठेतील आव्हान आणि संधी शॅलो पार्टिसिपेशन आहे. तीन वर्षांनंतरही आमच्याकडे सहा ते आठ कोटी युनिक म्युच्युअल आणि इक्विटी गुंतवणूकदार आहेत. दुसरे आव्हान हे आहे की जर आपल्याला पुढील १० दशलक्ष गुंतवणूकदार आणायचे असतील तर त्यांना सहज समजू शकतील अशा उत्पादनांची आवश्यकता आहे,' असं कामथ यांनी ट्वीटमध्ये नमूद केलंय. म्युच्युअल फंड हे यासाठी सर्वात योग्य साधन आहे. आम्हाला सर्व गुंतवणूकदारांना समजेल असे सोपे फंड आणि ईटीएफ तयार करायचे आहेत. विशाल जैन हे एएमसीचे सीईओ असतील असंही ते म्हणाले.