Nitin Kamath Zerodha: शेअर मार्केट अॅप Zerodha चे संस्थापक नितीन कामत (Nitin Kamath) यांनी त्यांच्या ऑफिसचा एक किस्सा शेअर केला आहे. Zerodha च्या मुख्य कार्यालयावर पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. यावेळी पोलिसांनी नितीन कामत यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला, त्यामुळे काही कर्मचारी तर रडायला लागले.
कामत यांनीच टाकला बनावट छापाएव्हलॉन लॅबचे सीईओ आणि संस्थापक वरुण मैय्या यांच्या 'वनप्लस ओपन कॉन्व्हर्सेशन'मध्ये बोलताना नितीन कामत यांनी हा मजेशीर किस्सा सांगितले. कर्मचाऱ्यांसोबत मस्करी करण्यासाठी कामत यांनी चक्क आपल्याच ऑफिसवर बनावट छापा टाकायला लावला. एका कन्नड अभिनेत्याला पोलिसांच्या वेशात झिरोदाच्या कार्यालयावर छापा टाकण्यासाठी पाठवले. कंपनीचे मालक असे कृत्य करतील, याचा विचारही कर्मचाऱ्यांनी केला नव्हता.
तुमचा संस्थापक लोकांची फसवणूक करुन पळून गेलाय, असे पोलिसांनी सांगताच अर्धे कर्मचारी रडायला लागले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात शूट करण्यात आली. त्या घटनेचा व्हिडिओ 2014 मध्येच अपलोड करण्यात आला होता. उच्च न्यायालयाचा खोटा आदेश घेऊन फेक पोलीस येतात आणि कर्मचाऱ्यांना घेराव घातल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी काही कर्मचारी या छाप्याचे कारण विचारतात तर काही या छाप्याला विरोध करतात. कर्मचाऱ्यांची परिस्थिती पाहून शेवटी नितीन कामत समोर येतात आणि हा प्रँक असल्याचे सांगतात.