Join us  

NMACC: नीता अंबानींच्या कल्चरल सेंटरसमोर 'फाइव्ह स्टार' हॉटेलही पडेल फिकं, तिकीटाचा दर सर्वसामान्यांनाही परवडेल असा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 5:02 PM

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी नुकतचं आपल्या ड्रीम प्रोजेक्ट NMACC चं उदघाटन केलं.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी नुकतचं आपल्या ड्रीम प्रोजेक्ट NMACC चं उदघाटन केलं. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (NMACC) उदघाटनाला बॉलीवूडपासून हॉलीवूपर्यंतचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित होते. यासाठी एका शानदार पार्टीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. ज्यात बॉलीवूड, क्रीडा आणि राजकीय क्षेत्राशी निगडीत दिग्गजांनी हजेरी लावली होती. जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज असलेल्या या कल्चरेल सेंटरमधून भारतीय कला थेट जागतिक व्यासपीठावर घेऊन जाण्यास मदत होणार आहे. 

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचे व्हिडिओ आणि फोटो तुम्हीही पाहिले असतील. या भव्य कल्चरल सेंटरमध्ये सर्वसामान्यांनाही उपस्थित राहता येणार आहे. कला क्षेत्राशी निगडीत कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे. पण यासाठी नेमकं तिकीट किती आणि प्रवेशासाठीचे नियम नेमके काय आहेत? हे जाणून घ्या...

ग्रँड थिएटर ऑडिटोरियममध्ये २ हजार लोकांची आसन क्षमताNMACC ची सर्वात आकर्षक बाब म्हणजे या सेंटरमधील The Grand Theatre आहे. या थिएटरमध्ये २ हजार लोकांची आसन व्यवस्था आहे. तसंच हे थिएटर कल्चरल प्रोग्रामसाठी एक शानदार आणि सर्व जागतिक दर्जाच्या सुविधांनी सज्ज रंगमंच उपलब्ध आहे. गोल्डन आणि रेड थिमवर आधारित या थिएटरमध्ये बाल्कनीची व्यवस्था देखील आहे. या थिएटरच्या निर्मितीसाठी जवळपास ८५०० हून अधिक स्वारोस्की क्रिस्टलचा वापर केला गेला आहे. यात १८ डायमंड बॉक्स तयार करण्यात आले आहे. कमळाच्या थीमवर आधारित आकर्षक झुंबर यात लावण्यात आला आहे. 

मिनी थिएटरमध्ये २५० जणांची आसन व्यवस्थाNMACC मध्ये Studio Theatre देखील बनवण्यात आलं आहे. यात २५० जणांची आसन व्यवस्था आहे. छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम डोळ्यासमोर ठेवून याची निर्मिती करण्यात आली आहे. या मिनी स्टेजसाठी करण्यात आलेली लाइटिंग आकर्षक बाब आहे. हे मिनी थिएटर म्यूझिक, नाटक आणि छोट्या कार्यक्रमांसाठी बनवण्यात आलं आहे. 

वर्कशॉप आणि सेमीनारसाठी वेगळी जागाजर तुम्हाला एखादं वर्कशॉप किंवा सेमीनार घ्यायचं असेल तर त्यासाठीचीही व्यवस्था येथे करण्यात आली आहे. यासाठी एक वेगळं क्यूब शेप इंटीमेट स्पेस तयार करण्यात आली आहे. ज्यात १२५ जणांची आसन व्यवस्था आहे. 

Art House चीही निर्मितीकल्चरल सेंटरमध्ये चार मजली Art House तयार करण्यात आलं आहे. जे जवळपास १६ हजार स्वेअरफूट जागेत उभारण्यात आलं आहे. या इमारतीचा वापर आर्ट गॅलरी आणि प्रदर्शनासाठी करता येणार आहे. 

म्युझिकल लाइट आणि साऊंड फाऊंटनकल्चरल सेंटरच्या बाहेरील जागेत एक म्युझिकल फाऊंटन देखील तयार करण्यात आलं आहे. जे संध्याकाळच्यावेळी लाइट आणि साऊंडसह एक वेगळाच आनंद देणारं आहे. फायर, वॉटर, साऊंड आणि लाइट थीमवर या फाऊंटनची निर्मिती करण्यात आली आहे. या कारंज्याला फाऊंटन ऑफ जॉय असं नाव देण्यात आलं आहे. याठिकाणी दररोज तुम्हाला ३० मिनिटांचा फाऊंटन शो पाहता येणार आहे. 

तिकीट किती?नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या या खास गोष्टींची माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हीही या सेंटरला भेट देण्याचा प्लान करत असाल तर या सेंटरमध्ये लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवेश मोफत आहे. तर इतर व्यक्तींकडून तेथील कार्यक्रमानुसार तिकीट आकारण्यात येणार आहे. NMACC च्या वेबसाइटवरील माहितीनुसार, कल्चरल सेंटरची प्रवेश फी कमीत कमी १९९ रुपयांपासून सुरू होते आणि ५०० रुपयांपर्यंत आहे. सध्या या सेंटरची सर्व तिकीटं विकली गेली आहेत आणि हाऊसफुल आहे. तुम्ही NMACC च्या वेबसाइटवर जाऊन तिकीट बूक करू शकता.

टॅग्स :नीता अंबानी