Join us

Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 12:30 PM

रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता खुद्द रतन टाटा यांनीच आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे.

देशातील दिग्गज उद्योजकआणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण याच दरम्यान खुद्द रतन टाटा यांनी आपल्या तब्येतीबद्दल स्पष्टीकरण दिलंय. तसंच आपली तब्येत गंभीर असल्याचं वृत्त या अफवा असल्याचं म्हटलंय.

रतन टाटा यांना लो ब्लडप्रेशरचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रात्री १२.३० ते १ दरम्यान ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं वृत्त समाजमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. यानंतर खुद्द रतन टाटा यानी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. "माझ्या प्रकृतीबाबत पसरत असलेल्या अफवांबद्दल मला कल्पना आहे आणि यात कोणतीही सत्यता नाही. सध्या वयापरत्वे आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी वैद्यकीय तपासणी करत आहे. चिंतेचं कोणतंही कारण नाही. माझी प्रकृती ठीक आहे आणि सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका," अशी प्रतिक्रिया त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली.

रतन टाटांच्या कार्यकाळात व्यवसायाचा विस्तार

टाटांची खरी कहाणी सुरू झाली ती १९६२ मध्ये, जेव्हा ते टाटा समूहात रुजू झाले. १९९० मध्ये समूहाचे अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी अनेक कामं केली आणि हळूहळू व्यवसायाची पायरी चढत गेले. त्यांच्या कार्यकाळात टाटा समूहाने देशांतर्गत आणि परदेशात भरीव वाढ आणि विस्तार केला. टाटांची दूरदृष्टी आणि धोरणात्मक विचारसरणीमुळे कंपनीला टेलिकॉम, रिटेल आणि ऑटो सारख्या नवीन उद्योगांमध्ये विस्तार करता आला.

टाटा समूहाच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण म्हणजे २००८ मध्ये जग्वार लँड रोव्हरचं अधिग्रहण. हे टाटांचं सर्वात उल्लेखनीय यश होतं. परोपकार आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी त्यांच्या समर्पणामुळे त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांसह असंख्य सन्मान मिळाले आहेत.

टॅग्स :रतन टाटा