नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. भारतातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, आतापर्यंत 500 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. तर या कोरोना व्हायरसनं जवळपास 11 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाला आपत्ती जाहीर करण्यात आलं असून, केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 3 महिन्यांपर्यंत इतर बँकांच्या एटीएममधून डेबिट कार्डच्या द्वारे पैसे काढल्यास पैसे काढण्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. याशिवाय बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक होणार नाही. कमीत कमी शिल्लक रकमेवरील शुल्क रद्द केले गेले आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. पुढील तीन महिन्यांसाठी एटीएममधून पैसे काढण्यावरचे निर्बंध हटवले आहेत. एटीएममधून चारपेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यावर कोणताही सरचार्ज वसूल केला जाणार नाही.
कोरोना विषाणूशी संबंधित प्रकरणांमध्ये आता सीएसआरचा निधी वापरला जाणार असल्याचंही सरकारने स्पष्ट केले आहे. आता हा निधी कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी वापरला जाणार आहे. देशात कोरोना विषाणूचा फैलाव लक्षात घेता सरकारने आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीचा वापर केला जाणार आहे. कोरोनाग्रस्तांसाठी लवकरच मदत पॅकेज जाहीर करण्याचेही अर्थमंत्र्यांची सूतोवाच केले आहेत. याशिवाय सेबी आणि रिझर्व्ह बँक काही प्रमाणात दिलासा देणार आहे.
There shall not be any minimum balance requirement fee (in bank accounts): Union Finance Minister Nirmala Sitharaman https://t.co/olSYTYRpMv
— ANI (@ANI) March 24, 2020
30 जूनपर्यंत प्राप्तिकर परतावा भरण्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे. उशिरा कर परतावा भरणाऱ्यांकडून 12ऐवजी 9 टक्के दंड आकारला जाणार आहे. कर परताव्यास उशीर झाल्यास दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख वाढवण्यात आली असून, आता 30 जून 2020 पर्यंत टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. तसेच आधार-पॅन लिंक करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मार्च, एप्रिल, मेचा जीएसटी भरणा 30 जूनपर्यंत करता येणार आहे. 'विवाद से विश्वास' योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे.