Join us  

जास्त फायद्यासाठी विमान प्रवाशांच्या खिशाला टोपी; नफावसुलीवर नियंत्रण नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 5:42 AM

विमानांचा कृत्रिम तुटवडा दाखवून आकारले जात आहे जादा प्रवासभाडे, काही मार्गांवर ४०० ते ५०० टक्के प्रवासभाडे 

संजय शर्मानवी दिल्ली : देशातील एअरलाइन्स कंपन्या कमी विमाने चालवून जास्त नफा वसूल करण्यात गुंतल्या आहेत. सर्व एअरलाइन्सनी आपली सर्व विमाने उतरवली तर प्रवासभाडे कमी होईल.

यावर्षी एकाच दिवसात तब्बल ४.५६ लाख विमान प्रवाशांची ने-आण करून सर्व विक्रम मोडले आहेत. यावर्षी विमान प्रवाशांच्या संख्येतही विक्रमी १४ टक्के वाढ झाली आहे. परंतु, या सर्वांचा फटका देशातील विमान प्रवाशांना सहन करावा लागत आहे. विमानाच्या प्रवासभाड्यात प्रचंड वाढ झाली असून, काही मार्गांवर तर तब्बल ४०० ते ५०० टक्के प्रवासभाडे वाढवण्यात आलेले आहे. प्रवासभाडे २० हजार रुपयांवर पोहोचले आहे.

विमाने फुल्ल झाली आहेत, असे सांगून प्रवासभाडे वाढविण्यात आले. परंतु कंपन्यांनी आपली सर्व विमाने सेवेत उतरवलीच नाहीत. स्पाइस जेटने ५० टक्के, तर विस्तारासारख्या कंपन्यांनी १० टक्के विमाने कमी चालवली. गो-फर्स्टने सर्व विमाने बंद केली. याचा फटका भारतातील विमान प्रवाशांना बसला. त्यांना अनेकपट दाम मोजून प्रवास करावा लागला.

सर्वांत चांगला काळ असतानाही...विशेष म्हणजे सरकारकडून दावा केला जात आहे की, भारतात प्रवासी उद्योगातील हा सर्वांत चांगला काळ आला आहे. भारतात विमान प्रवाशांची संख्या वाढली आहे. २९७८ विमाने देशात प्रवाशांची ने-आण करताहेत. विमानतळांची संख्या वाढली असून, ती ७३ वरून १४८ झाली आहे. याबरोबरच हेलिपोर्ट व दोन वॉटर एअरोड्रोम्सही तयार करण्यात आलेले आहेत. ४६० नवीन मार्ग शोधण्यात आले आहेत. छोट्या-छोट्या शहरांनाही विमानांद्वारे जोडण्यात आले आहे.

५०० किलोमीटरसाठी टॅक्सीपेक्षाही कमी भाडेप्रत्येकाचे हवाई सफर करण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करीत आहेत, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे सातत्याने सांगत आले आहेत, हे विशेष. देशातील प्रत्येक लहान-मोठ्या शहरांना हवाई नेटवर्कने जोडण्यात येत आहे. ५०० किलोमीटरच्या अंतरासाठी २५०० रुपये प्रवासभाडे निश्चित केले आहे. ते टॅक्सीपेक्षाही कमी आहे. विमानतळांची संख्याही वाढली आहे. देशांतर्गत प्रवाशांची संख्या ३६.१०%पर्यंत वाढली आहे.

जास्त फायद्यासाठी...एअरलाइन्स कंपन्या मुद्दामहून निश्चित केलेल्या कोट्यापेक्षा कमी विमानांचे उड्डाण करून कृत्रिम तुटवडा निर्माण करीत आहेत. यामुळे आता कोणतेही विमान शिल्लक नाही, असे प्रवाशांना वाटावे व जेवढ्या किमतीला तिकीट मिळते तेवढ्या किमतीला त्यांनी घेऊन टाकावे; परंतु यात अधिक नफावसुली केली जात आहे. यावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नाही. ‘डीजीसीए’ने सर्व कंपन्यांची निश्चित केलेली विमाने पूर्णपणे सुरू करावीत. कोरोनापूर्वीच्या काळात विमान प्रवाशांची संख्या ४.२० लाखांपर्यंत गेली होती; तर कोरोनानंतर ही संख्या ३० हजारांनी वाढली आहे. तीन वर्षांत विमान प्रवासीही वाढले आहेत, संख्याही वाढली आहे. - जितेंद्र भार्गव, माजी कार्यकारी संचालक, एअर इंडिया