Join us  

फास्टॅग नाही, वाहनाच्या नंबर प्लेटवरून टोल कापला जाईल,कारची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2024 2:36 PM

भारतात टोल भरण्याची प्रक्रिया सध्या फास्टॅगवर सुरू आहे. पण, आता टोल प्लाझावर ANPR कॅमेऱ्यांद्वारे टोल वसूल करण्याची तयारी सुरू आहे.

देशात सध्या फास्टॅगवरुन टोल भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यात आणखी काही बदल करण्यासाठी केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. यासाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळखणारे कॅमेरे म्हणजेच ANPR कॅमेरे टोलनाक्यांवर बसवण्यात येणार आहेत, त्यांच्या मदतीने फास्टॅगऐवजी वाहनांच्या नंबर प्लेटवरून टोल टॅक्स कापला जाणार आहे. हरियाणातील हिसार आणि रोहतक जिल्ह्यात प्रत्येकी एक टोलनाक्यांवर नवीन यंत्रणा बसवण्याचे कामही सुरू झाले आहे. सुमारे दोन महिन्यांनंतर या दोन्ही टोलनाक्यांवर वाहनांच्या नंबर प्लेटवरून टोल टॅक्स कापण्यास सुरुवात होईल. 

UPI द्वारे चुकीचं पेमेंट केलंय? मग 'हे' काम त्वरित करा, पैसे येतील परत

या दोन टोलनाक्यांवरील यशस्वी चाचणीनंतर पहिल्यांदा हरियाणा आणि नंतर देशातील इतर राज्यांमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल. यामुळे टोल नाक्यांवर होणारी फसवणूक थांबेल. नवीन सिस्टीम लागू झाल्यावर, वाहनाची नंबर प्लेट देखील फास्टॅगशी जोडलेल्या बँक खात्याशी जोडले जाईल. ज्यावेळी वाहन टोल नाक्यावर पोहोचेल त्यावेळी कॅमेरा नंबर प्लेट ओळखेल आणि टोल टॅक्स घेईल.

काही सेकंदाच नंबरप्लेट स्कॅन होणार 

हिसार आणि रोहतक टोलच्या रामायण टोल प्लाझावर ऑटोमॅटिक नंबर प्लेट ओळख आधारित स्कॅनिंग कॅमेरे आणि नवीन संगणक प्रणाली इनस्टॉल केले जात आहे. हे कॅमेरे पॉवरफुल असतील, ते काही सेकंदाच तुमच्या वाहनाची नंबरप्लेट स्कॅन करतील आणि टोल टॅक्स घेतला जाईल.

वाहन टोलजवळ येताच लाल दिवा लागेल. ऑपरेटरकडून तुम्हाला पुढचा सिग्नल मिळेपर्यंत वाहन तेथेच उभे राहील. यासोबतच टोल भरण्यासाठी थांबलेल्या वाहनाचा क्रमांक आणि वाहनाचे मॉडेलही स्क्रीनवर लिहिले जाणार आहे. जर ड्रायव्हरचा FASTag काम करत नसेल तर नंबर प्लेट स्कॅन होताच बँकेच्या सर्व्हरवरून टोल कंपनीला संदेश पाठवला जाईल. हे फास्टॅग ओरिजिनल आहे की नाही हेही कळणार आहे. 

भारतात, आता वाहनांवर उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स म्हणजेच HSRP आहेत. अशा नंबर प्लेट्सवरून वाहनाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होते. सरकारने २०१९ मध्येच या विशेष नंबर प्लेट्स बसविण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :टोलनाका