पुणे - सध्या कॉर्पोरेट लाईफमध्ये आठवड्याला ७० तास काम करायचं की ९० तास यावरून बरीच चर्चा आहे. त्यातच पुण्यातील इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने नोकरीचा राजीनामा दिला आहे आणि नोकरीच्या कालावधीतला त्याचा अनुभव सोशल मीडियात शेअर केला आहे. सध्या ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ना दुसऱ्या नोकरीचा शोध किंवा एखाद्या कंपनीची चांगली ऑफर हाती नसतानाही पुणे ऑफिसमध्ये कार्यरत सीनियर सिस्टम इंजिनिअर भूपेंद्र विश्वकर्मा यांनी नोकरी सोडली.
भूपेंद्र विश्वकर्मा यांच्यासाठी हा निर्णय घेणे सोपे नव्हते. सध्याच्या युगात नोकरीशिवाय जगणं खूप कठीण असते. बहुतांश कर्मचारी दुसरीकडील जॉब ऑफर मिळाल्यानंतर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतात परंतु भूपेंद्र विश्वकर्मा यांनी त्याचीही वाट पाहिली नाही. त्यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर करत नारायण मूर्ती यांच्या इन्फोसिस कंपनीत काम करताना येणाऱ्या अडचणींचा पाढाच वाचला आहे. आता भूपेंद्रचं नोकरी का सोडली आणि त्यामागे काय कारणे होती याबाबत जाणून घेऊया.
'या' ६ कारणानं सोडली नोकरी
१-३ वर्षात चांगली ग्रोथ नाही - भूपेंद्र विश्वकर्मा यांनी इन्फोसिस पुण्यातील कार्यालयात सिस्टम इंजिनिअर म्हणून जॉईन केले परंतु ३ वर्ष मेहनत आणि चांगली कामगिरी करूनही त्यांना सीनियर सिस्टम इंजिनिअर म्हणून बढती मिळाली परंतु त्यात कुठल्याही प्रकारची सॅलरी हाईक दिली नाही.
टीम कमी अन् कामाचा भार जास्त - विश्वकर्मा यांच्या टीममध्ये पूर्वी ५० लोक होते, आता ३० उरलेत ही परिस्थिती असताना कंपनीने नवीन कर्मचारी भरती केली नाही. ज्या लोकांनी नोकरी सोडली त्यांचे काम उरलेल्या कर्मचाऱ्यांवर सोपवले. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा बोझा वाढला त्याबदल्यात कंपनीकडून त्यांना फारसा मोबदला दिला नाही.
करिअर ग्रोथ संपण्याच्या मार्गावर - भूपेंद्र यांना त्यांच्या टीममध्ये कुठलीही ग्रोथ दिसत नव्हती. ते ज्या विभागात काम करायचे त्यांच्या मॅनेजरनुसार तो विभाग तोट्यात होता. त्याचा परिणाम पगार वाढीवर आणि करिअर ग्रोथवर होत होता. प्रोफेशनली त्याठिकाणी काम करून ग्रोथ संपल्यासारखी वाटत होती, तिथे सुधारणेचीही अपेक्षा नव्हती असं भूपेंद्र विश्वकर्मा यांनी म्हटलं.
टॉक्सिक वर्क कल्चर - क्लाईंट्सच्या अवास्तव अपेक्षांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव वाढत होता. छोटी छोटी कारणेही टेन्शन वाढवतात. संघर्षाच्या या स्थितीत कुठलीही पर्सनल ग्रोथ होत नव्हती.
कामगिरीचं मूल्य नव्हतं - भूपेंद्रच्या कामाचं वरिष्ठ आणि सहकारी कौतुक करायचे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रमोशन, सॅलरी हाईक अथवा अन्य ग्रोथ मिळत नव्हती. कुठल्याही पुरस्काराशिवाय सातत्याने आपलं शोषण होतंय असं त्यांना वाटत होते.
हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष - ऑनसाईट संधी कधीही योग्यतेच्या आधारे दिली जात नव्हती त्यासाठी भाषिक प्राधान्य दिले जायचे. तेलुगु, तामिळ, मल्ल्याळम बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना अशी संधी मिळायची पण माझ्यासारख्या हिंदी भाषा बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष केले जायचे असाही आरोप त्याने केला.
दरम्यान, हे सर्व अनुभव फक्त माझ्या एकट्याचे नाहीत तर असंख्य कर्मचारी आहेत त्यांनाही हे अनुभवावं लागतंय. माझ्याकडे कुठलीही चांगली संधी नसताना मी नोकरी सोडली कारण आत्मसन्मान आणि मानसिक आरोग्याशी मी तडजोड करू शकत नव्हतो. जमिनीवरचं वास्तव लपवण्याचा मॅनेजरने बंद करावे आणि या समस्यांचा तोडगा काढावा. कर्मचारी शोषण करणारी मशीन नाही तीदेखील माणसं आहेत असं भूपेंद्र विश्वकर्मा याने सांगितले.