नवी दिल्ली : जवळपास सर्वच वाहननिर्मिती कंपन्यांमध्ये मंदीचे वातावरण असताना आणि ई-व्हेईकल येण्याच्या शक्यतेने पेट्रोल व डिझेलवरील वाहनांना अजिबात मागणी नसताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल व डिझेलवरील वाहनांवर बंदी आणण्याचा सरकारचा अजिबात विचार नाही, असे गुरुवारी स्पष्ट केले.
सोसायटी आॅफ आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चररर्स (सियाम)च्या परिषदेत ते म्हणाले की, पेट्रोल व डिझेलवरील वाहनांवर बंदी आणावी, असा प्रस्ताव सरकारपुढे आणला होता. पण सरकारने तो मान्य केलेला नाही. त्यामुळे या वाहनांच्या विक्री व उत्पादनावर बंदी आणणार नाही. वाहन उद्योगातील मंदीच्या पार्श्वभूमीवर गडकरी यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. यामुळे पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची खरेदी वाढू शकेल आणि कंपन्यांवरील संकट बरेच कमी होईल, असे सांगण्यात येते.