नवी दिल्ली - पावसाळ्यानंतर शेतीसंबंधित विविध कामांना वेग आल्याने ग्रामीण भागातील एकूण व्यवहारांना गती मिळते. याचेच प्रत्यंतर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) अहवालात दिसते. यातील आकडेवारीनुसार ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात बेरोजगारीचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांत ग्रामीण भागात सरासरी बेरोजगारी दर ८.४ टक्के इतका राहिला. ऑक्टोबरच्या तुलनेत हा १०.८ टक्के कमी आहे. शहरांमधील बेरोजगारी मात्र वाढू शकते.
देशात १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांमध्ये बेरोजगारी दर नोव्हेंबरमध्ये घटू शकतो. ऑक्टोबरमध्ये बेरोजगारी दर १०.१ टक्के इतका उच्चांकी होता. नोव्हेंबरच्या तीन आठवड्यांमध्ये सरासरी बेरोजगारी दर १० टक्क्यांपेक्षा कमी होता. नोव्हेंबरमध्ये हा बेरोजगारी दर ९ टक्क्यांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सीएमआयईच्या आकडेवारीनुसार १९ नोव्हेंबरपर्यंत तीन आठवड्यांमध्ये मिळून देशाचा सरासरी बेरोजगारी दर ८.८ टक्के इतका राहिला. (वृत्तसंस्था)
कामगार सहभागात घट
शहरी विभाग ३९.४% ३८.९%
ग्रामीण विभाग ४२.८% ४१.९%
या अहवालानुसार नोव्हेंबरमध्ये ग्रामीण तसेच शहरी दोन्ही विभागांमध्ये कामगार सहभाग दरात (एलपीआर) घट होऊ शकते. या महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये दोन्ही भागांमध्ये एलपीआरमध्ये घट झाली आहे.
काय म्हणतो बेरोजगारी दर ?
- सीएमआयईच्या अहवालानुसार, ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये ग्रामीण भागात बेरोजगारी कमी होण्याची शक्यता आहे. शहरांमध्ये मात्र बेरोजगारी वाढणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये ग्रामीण भागात सरासरी बेरोजगारी दर ८.४ टक्के इतका होता.
- १९ नोव्हेंबरपर्यंत ग्रामीण भागात रोजगार मिळण्याची शक्यता ३८.२ वरून ३८.४ टक्क्यांवर पोहोचली आहे, तर शहरांमध्ये नोकऱ्या मिळण्याची शक्यता घटून ३५.१ टक्क्यांवर पोहोचली आहे.