ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14- रेल्वेचा प्रवास सगळेच जण करतात. सगळ्यांना परवडणारा प्रवास म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. हा प्रवास आरामदायी असतो पण कधीकधी तो त्रासदायकसुद्धा ठरतो. विशेष म्हणजे चांगले-वाईट असे दोन्हीही अनुभव रेल्वेचा प्रवास करताना येत असताना. लांबपल्ल्याचा प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना वाईट अनुभवांना सामोरं जावं जागतं. आरक्षित डब्यात तिकीट असलेले प्रवासी येणं किंवा ते दादागिरी करणं अशा अनेक घटना आपण ऐकत असतो. रेल्वेतून लांबपल्ल्याचा प्रवास करताना असाच वाईट अनुभव एका प्रवाशाला आला. पण यामुळे नुकसान भरपाई म्हणून त्याला चक्क 75 हजार रुपये देण्याचा आदेश दिल्ली ग्राहक मंचाने रेल्वे मंत्रालयाला दिला आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.
एक प्रवासी ३० मार्च २०१३ रोजी दक्षिण एक्स्प्रेसने प्रवास करत होता. गुडघ्याच्या दुखण्यामुळे त्याने लोअर बर्थचं तिकीट काढलं होतं. तो प्रवासी असलेली ट्रेन मध्य प्रदेशच्या बिना स्टेशनवर थांबली होती. तेव्हा बिना स्टेशनवर आरक्षित तिकीट नसलेले काही प्रवाशी आरक्षित डब्यात चढले. त्यांच्याकडे तिकीट नसतानाही त्यातील या प्रवाशाने सीटवर कब्जा केला. यामुळे या गुडघा दुखत असताना प्रवाशाला उभं राहून प्रवास करावा लागला. तसंच या प्रवासात एकदाही तिकीट निरीक्षक बोगीत आला नाही, त्यामुळे इतर प्रवाशांच्या दादगिरीमुळे हतबल होऊन या प्रवाशाला गुडघे दुखीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागला. रेल्वेच्या या वागणुकीमुळे आणि प्रवाशाला झालेल्या त्रासाबद्दल त्याने ग्राहक मंचात तक्रार केली होती. तसंच नुकसान भरपाई म्हणून २० लाख रूपये मागितले होते. या तक्रारीवर सुनावणी करताना ग्राहक मंचाने रेल्वेला नुकसान भरपाई म्हणून ७५ हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. तसंच 30 मार्च 2013 रोजी ड्युटीवर असणाऱ्या तिकीट निरीक्षकाला बोगीमध्ये अनुपस्थित असल्याने २५ हजारांचा दंड आकारण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले आहेत.
न्यायमूर्ती वीणा बिरबल आणि सलमा नूर यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा मांडण्यात आला होता. या प्रकरणी प्रतिवादीला आपला मुद्दा मांडण्याची संधी देण्यात आली होती. पण त्यांनी काहीही उत्तर दिलं नाही म्हणूनच नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात येतं आहे.