देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) सध्या खूप चर्चा होत आहे. कधी संसदेत विरोधक त्यावर निशाणा साधतात तर कधी पंतप्रधान त्याचे कौतुक करतात. अविश्वास ठरावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एलआयसीचं कौतुक केलं. एलआयसीची स्थिती किती मजबूत आहे याबद्दल त्यांनी भाष्य केलं. एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी पंतप्रधान मोदींच्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले आहेत.
"आम्ही पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाबद्दल उत्साहित आणि कृतज्ञ आहोत. गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत एलआयसीचं कौतुक केलं, तेव्हापासून गुंतवणूकदार, पॉलिसीधारक आणि भागधारकांप्रती आमची जबाबदारी आणि उत्तरदायित्व अधिक वाढलं आहे. पंतप्रधानांच्या स्तुतीचा परिणाम कंपनीच्या भविष्यातील निकालांवरही दिसून येईल," असा विश्वास टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सिद्धार्थ मोहंती यांनी व्यक्त केला.
अदानीतील गुंतवणूकीतून नुकसान नाही
"आम्हाला कोणत्याही एका कंपनीबद्दल बोलायचं नाही. परंतु अदानींच्या कंपनीतील गुंतवणूकीतून एलआयसीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. आम्ही धोरणं आणि प्रोटोकॉलनुसार अदांनींच्या कंपनीत गुंतवणूक केली. जेव्हा कंपनीच्या शेअर्सची किंमत कमी होती तेव्हा आम्ही गुंतवणूक केली. जेव्हा किंमत वाढली तेव्हा आम्हाला त्याचा फायदा मिळाला," असं ते म्हणाले.
"आम्ही आमच्या इंटरनल प्रोटोकॉल आणि रेग्युलेशन लक्षात घेऊन अदानींच्या कंपनीत गुंतवणूक केली," असंही मोहंती यांनी स्पष्ट केलं. एलआयसी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. त्यांचे १३ लाख विमा एजंट आहेत. अधिक विस्तारासाठी एजंट्सची संख्या वाढवण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.