यूपीआयमुळे दैनंदिन आयुष्य अत्यंत सोपं झालं. दुकानात सामान घेतल्यानंतर आता सुट्टे पैसे घ्यायची, द्यायची झंझट संपली आहे. पण तुम्हाला आठवतंय का? यूपीआय येण्याच्या आधी दुकानदार एक किंवा दोन रुपये नसल्यास त्याऐवजी ग्राहकांना चॉकलेट द्यायचे. सुट्टे पैसे म्हणजे एक, दोन रुपयांची चॉकलेट्स असं समीकरण झालं होतं. मात्र आता सुट्टे नाहीत, मग घ्या चॉकलेट हे जवळपास बंद झालं आहे. याचाच मोठा फटका अनेक कंपन्यांना बसल्याचं आता समोर आलं आहे.
कोरोना काळात यूपीआयचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण याचा चॉकलेट्सच्या व्यवसायावर परिणाम झाला. क्रेड आणि डंझोमध्ये ग्रोथ लीडर असलेल्या आणि ग्रोथएक्सचे संस्थापक असलेल्या अभिषेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीआय आल्यामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्न मिटला. पाटील यांनी सोशल नेटवर्किंग साईट लिंक्डइनवर एक पोस्ट केली आहे. यूपीआय आणि कँडी बिझनेसशी संबंधित काही आकडे त्यांनी पोस्टमध्ये दिले आहेत.
2010 मध्ये माँडलेज, नेस्ले, पारले, आयटीसी, मार्ससह अनेक मोठ्या कंपन्यांनी चक्रावून टाकणारा नफा नोंदवला. मात्र 2020 मध्ये यातील बहुतांश कंपन्यांच्या चॉकलेट्सच्या विक्रीत खूप मोठी घट झाली आहे. चॉकलेट, कँडींची विक्री घटण्यास अनेक कारणं जबाबदार आहेत. यातील महत्त्वाचं कारण म्हणजे सुट्ट्या पैशांच्या बदल्यात कँडी, चॉकलेट दिलं जाणं. सुट्टे पैसे नाहीत मग घ्या चॉकलेट ही स्कीम कोरोना काळात जवळपास संपुष्टात आली. यूपीआय येण्याआधी दुकानदार सुट्टे नसल्यास हातावर चॉकलेट द्यायचे. याच माध्यमातून मोठा व्यवसाय व्हायचा.
एक, दोन रुपये नसल्यास दुकानदार चॉकलेट द्यायचे. दिवसभरात या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चॉकलेट्स विकली जायची. मात्र आता सुट्ट्या पैशांचा प्रश्न निर्माण होत नाही. यूपीआयमुळे ग्राहक ऑनलाईन पेमेंट करतात. त्यामुळे सुट्टे नाहीत तर घ्या चॉकलेट हे जवळपास बंद झालं आहे. याच कारणामुळे चॉकलेट्सच्या विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"