Join us

पेमेंट करताना आता पिनची कटकट नाही! सिंगल क्लिक पेमेंट तत्काळ करणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 10:14 AM

अनेक लहान लहान व्यवहारांनी ग्राहकांचे पासबुक भरून जायचे; परंतु यात तसे होणार नाही

यूनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच यूपीआयच्या आधारे व्यवहार करण्याचे प्रमाण हल्ली वेगाने वाढले आहे. लहान-लहान रकमेचे व्यवहार सहजपणे करता यावेत यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर २०२२ मध्ये यूपीआयचे लाइट फीचर लाँच केले होते. आता अशाच प्रकारचे फीचर पेटीएमनेही आणले आहे. विशेष म्हणजे यात २०० रुपयांपर्यंतचा व्यवहार करण्यासाठी यूपीआय पिन टाकण्याची गरज असणार नाही. यामुळे ग्राहकाला सिंगल क्लिक पेमेंट तत्काळ करणे शक्य आहे. 

फायदा काय? अनेक लहान लहान व्यवहारांनी ग्राहकांचे पासबुक भरून जायचे; परंतु यात तसे होणार नाही. हे व्यवहार केवळ पेटीएम बॅलन्स तसेच हिस्ट्री या सेक्शनमध्ये दिसणार आहेत. वॉलेटचे दिवसाचे लिमिट किती? लाइट वॉलेटमध्ये एका वेळी जास्तीत जास्त दोन हजार रुपये भरता येतील. दिवसातून जास्तीत जास्त दोन वेळा वॉलेटमध्ये एकूण चार हजार रुपये भरता येतील. या रकमेतून २०० रुपयांपर्यंतचे किमान २० व्यवहार करणे शक्य होईल.

सर्वप्रथम पेटीएम ॲप अपडेट करा. मग ॲपमध्ये होमपेजवर प्रोफाइलवर टॅप करा. नंतर यूपीआय अँड पेमेंट सेटिंग्सवर क्लिक करा आणि अदर सेटिंग्समध्ये यूपीआय लाइटवर टॅप करा. यानंतर यूपीआय लाइटसाठी योग्य अकाैंटची निवड करा. नंतर यूपीआय लाइटमध्ये पैसे आणि यूपीआय पिन टाकून व्हॅलिडेट करताच यूपीआय लाइट अकाैंट तयार होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक