लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इर्डा) जाहिरातविषयक नियमात बदल केल्यामुळे ‘युनिट लिंक्ड विमा योजना’ (युलिप) यापुढे गुंतवणूक उत्पादन म्हणून विकता येणार नाही.
इर्डाने बुधवारी यासंदर्भातील एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘युनिट - लिंक्ड’ अथवा ‘इंडेक्स - लिंक्ड’ विमा उत्पादनांची जाहिरात ‘गुंतवणूक उत्पादन’ म्हणून करता येणार नाही. शेअर बाजाराशी जोडलेल्या या योजना पारंपरिक विमा पॉलिसींपेक्षा भिन्न आहेत, असे विमा कंपन्यांना जाहिरातीत सांगावे लागेल. गुंतवूकदारांमध्ये स्पष्टता येण्यासाठी इर्डाने हे परिपत्रक जारी केले आहे.
जोखमीचा खुलासा आवश्यकइर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले की, परिवर्तनीय वार्षिक हप्ता असलेल्या सर्व लिंक्ड विमा पॉलिसी आणि वार्षिक उत्पादनांमध्ये असलेल्या जोखमीचा खुलासा विमा कंपन्यांनी आपल्या सर्व जाहिरातींत करणे आवश्यक आहे.
काय आहे युलिप?
- युलिप ही अशी विमा पॉलिसी आहे, ज्याद्वारे विमा संरक्षण आणि गुंतवणुकीचे फायदे मिळतात. - ग्राहकांनी योजनेत भरलेल्या हप्त्याच्या रकमेपैकी काही रक्कम कंपनी शेअर बाजारात गुंतवते. म्युच्युअल फंडांसारखे युनिट विमाधारकास मिळतात. - या योजनेत परताव्याची कोणतीही हमी नसते. बाजारातील गुंतवणुकीवर लाभ अवलंबून असतात. कारण त्यात जाेखीम असते.