ट्विटरचे नवे मालक एलन मस्क यांनी अजब निर्णय घेतला आहे. ट्विटर ताब्यात घेताच कर्मचारी कपात करणार असल्याच्या वृत्तांचे खंडन करणाऱ्या मस्क यांनी कर्मचारी आपणहूनच नोकरी सोडून जातील अशी व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत नियम कठोर असताना देखील मस्क यांनी आठवड्याचे सातही दिवस १२-१२ तास काम करण्याचे आदेश आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
मस्क यांनी आल्या आल्याच ट्विटरच्या बड्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला होता. याचबरोबर ते ७५ टक्के कर्मचारी कपात करतील अशी अटकळ गेल्या काही दिवसांपासून लावली जात होती. मस्क यांनीच तसे आपल्या गुंतवणूकदारांना सांगितले होते. परंतू, कंपनी ताब्यात घेतल्यावर कर्मचाऱ्यांत अस्वस्थता पसरल्याने मस्क यांनी कोणालाही नोकरीवरून कमी करणार नसल्याची सारवासारव केली होती. परंतू, आता त्यांनी मोठा तुघलकी गेम खेळला आहे.
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांनी आठवड्याचे सातही दिवस १२ तास काम करण्यास तयार रहावे, नाहीतर त्यांची नोकरी जाईल, असे तुघलकी फर्मान मस्क यांनी काढले आहे. मस्क यांनी गेल्या काही दिवसांतच धक्कादायक निर्णय घेतले आहेत. ४४ अब्ज डॉलरला पडलेला हा सौदा मस्क यांना फायद्यात आणायचा आहे. हा पैसा लवकरात लवकर वसूल करण्यासाठी मस्क यांनी ब्ल्यू टीकचे सबस्क्रीप्शन आणले आहे. महिन्याला आठ डॉलर मोजावे लागणार आहेत. मस्क यांच्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी ट्विटरने अनेक इंजिनिअरना आठवड्याचे सातही दिवस १२ तास काम करण्यास बजावले आहे. मस्क यांनी सांगितलेले बदल तातडीने अमलात आणण्यासाठी काम करण्याचे फर्मान ट्विटर मॅनेजमेंटने काढले आहे.
मस्क यांना अनेक बदल करायचे आहेत. हे बदल करण्यासाठी या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याची डेडलाईन दिली आहे. महत्वाचे म्हणजे या कामाच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतन किंवा नोकरीची हमी आदी काहीच देण्यात आलेले नाही. जर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सर्व कामे पूर्ण झाली नाहीत, तर नोकरी जाऊ शकते, असे या कर्मचाऱ्यांना सांगितले गेले आहे.