लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना रेल्वेसाठी कोणतीही नवी घोषणा केली नाही. अर्थमंत्र्यांनी रेल्वेचा फक्त एकदाच उल्लेख केला. रेल्वेच्या विकासासाठी अर्थसंकल्पात एकूण २ लाख ६२ हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पीय संसाधनांमधून अतिरिक्त १० हजार कोटी रुपये दिले.
अर्थसंकल्पात वंदे भारत, वंदे मेट्रो, बुलेट ट्रेन आणि प्रगती यानवीन गाड्यांबाबत काहीच घोषणा नाही.
अर्थसंकल्पात रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी (उत्पन्न अधिक भांडवल) १ लाख ८ हजार ७९५ कोटी रुपये खर्चाची तरतूद आहे. नवीन रेल्वे लाइन निर्मितीसाठी ३४ हजार ६०३ कोटी, विद्युतीकरणासाठी ६४७२ कोटी, रेल्वे दुहेरीकरणासाठी २९ हजार ३१२ कोटी, रेल्वे रुळांच्या सुधारणांसाठी १७ हजार ६५२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी १५ हजार ५११ कोटी रुपयांची तरतूद आहे.
रेल्वेसाठी चांगली तरतूद केल्याचे दिसते
- अनंत बोरकर
अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या मोदी ३.० या पहिल्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी चांगली आर्थिक तरतूद केल्याचे दिसत आहे. या आर्थिक तरतुदीतून नवीन रेल्वे लाइन टाकणे, वंदे भारत स्लीपर कोच रेल्वे सुरू करणे, अमृत भारत रेल्वे परिवर्तन करून त्या सामान्य जनतेला परवडतील, अशा स्वरूपात चालवणे, तसेच नवीन मेट्रो सुरू करणे या गोष्टी आगामी काळात होतील, असे अपेक्षित आहे. त्यातून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल, अशी आशा आहे. तसेच रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यातून रेल्वे अपघातमुक्त होण्यास मदत होईल, असे वाटते. असे असले तरी प्रवाशांसाठी सुविधा देण्याबाबत आणखी तरतूद व्हायला हवी होती असे वाटते. तसे पाहता रेल्वेसाठी पूर्वीप्रमाणे स्वतंत्ररीत्या अर्थसंकल्प सादर करण्याची आवश्यकता आहे. त्यातूनच रेल्वेसाठी होणाऱ्या तरतुदी ठळकपणे लक्षात येतात.