Join us

‘आर्थिक संकटावर मात करण्यासाठी नोटा छपाई नाही’; केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 8:41 AM

साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी नोटा छापण्याची काही योजना सरकारने आखली आहे का? असा प्रश्न एका खासदाराने त्यांना विचारला होता.

ठळक मुद्दे२०२०-२१ या वित्त वर्षात भारताचे सकळ राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ७.३ टक्क्यांनी घसरले आहे.भारत मिशनमुळे २०२०-२१ च्या दुसऱ्या वर्षार्धात अर्थव्यवस्था मजबुतीने सुधारणेच्या मार्गावर वाटचाल मागील दोन वर्षांपासून दोन हजारांच्या नोटांची छपाई करण्यात आलेली नाही.

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चलनी नोटा छापण्याची कोणतीही योजना नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिले.

साथीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी नोटा छापण्याची काही योजना सरकारने आखली आहे का? असा प्रश्न एका खासदाराने त्यांना विचारला होता. त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. सीतारामन यांनी सांगितले की, २०२०-२१ या वित्त वर्षात भारताचे सकळ राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ७.३ टक्क्यांनी घसरले आहे. तथापि, अर्थव्यवस्थेचे सर्व आधार मजबूत आहेत. आत्मनिर्भर भारत मिशनमुळे २०२०-२१ च्या दुसऱ्या वर्षार्धात अर्थव्यवस्था मजबुतीने सुधारणेच्या मार्गावर वाटचाल करीत आहे.

यंदा मार्चमध्ये सरकारने संसदेत सांगितले होते की, मागील दोन वर्षांपासून दोन हजारांच्या नोटांची छपाई करण्यात आलेली नाही. २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षांत दोन हजारांच्या नोटांच्या छपाईचे कोणतेही आदेश छापखान्यांना देण्यात आलेले नाहीत. कोणत्या नोटांची किती छपाई करायची याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्याने सरकार घेते. लोकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडावेत, हा उद्देश नजरेसमोर ठेवून नोटांची छपाई केली जाते.

रिझर्व्ह बँकेने २०१९ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, २०१६-१७ या वित्त वर्षात दोन हजारांच्या ३,५४२.९९१ दशलक्ष नोटांची छपाई करण्यात आली. २०१७-१८ मध्ये केवळ १११.५०७ दशलक्ष नोटाच छापण्यात आल्या. २०१८-१९ मध्ये छपाई आणखी कमी करून ४६.६९० दशलक्षांवर आणण्यात आली.

टॅग्स :निर्मला सीतारामन