“जर भारत २०५० पर्यंत ३० हजार अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनला, तर देशात कोणीही रिकाम्या पोटी झोपणार नाही,” असं वक्तव्य उद्योजक गौतम अदानी यांनी गुरूवारी केलं. “आपण २०५० या वर्षापासून जवळपास १० हजार दिवस दूर आहोत. या कालावधीत आपण आपल्या अर्थव्यवस्थेत २५ हजार अब्ज डॉलर्स जोडू अशी मला अपेक्षा आहे. यानुसार एका दिवसाला २.५ अब्ज डॉलर्स बनतात. यासोबतच गरीबीच्या सर्व प्रकारांना आपण मागे सोडून देऊ अशी मला आशा आहे,” असंही ते म्हणाले. टाइम्स नेटवर्क इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्हमध्ये त्यांनी यावर भाष्य केलं.
“जर योजनेनुसार अर्थव्यवस्था वाढली, तर या १० हजार दिवसांत शेअर बाजाराचे बाजार भांडवल सुमारे ४० हजार अब्ज डॉलर्सनं वाढेल. जे २०५० पर्यंत दररोज चार अब्ज डॉलर्स बनते,” असंही अदानी यांनी स्पष्ट केलं. या कालावधीत १.४ अब्ज लोकांच जीवनमान उंचवायचं असेल तर हे एका मॅरेथॉनप्रमाणे वाटू शकतं. परंतु हे दीर्घ कालावधीच्या स्प्रिंटप्रमाणे असल्याचंही त्यांनी नमूद केलं. एक राष्ट्र म्हणून आपण १० हजार दिवसांमध्ये हे पूर्ण करू शकत असल्याचा विश्वासही अदानींनी व्यक्त केला. २०२१ या वर्षांत सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क, जेफ बेजोस यांच्यापेक्षा अधिक संपत्ती गौतम अदानी यांनी जोडली आहे.
दारिद्र्याचे प्रमाण घटले
वाढत्या गरिबीबाबत नेहमीच आंतरराष्ट्रीय स्तरावर विकसित राष्ट्रांकडून लक्ष्य होणाऱ्या भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २०११ ते २०१९ या आठ वर्षांत १२.३ टक्क्यांनी कमी झाल्याचे वर्ल्ड बँकेच्या एका अहवालातून समोर आले आहे. २०११ मध्ये भारतातील दारिद्र्याचे प्रमाण २२.५ टक्के होते ते २०१९ मध्ये १०.२ टक्के इतके खाली आले आहे. या आठ वर्षांत ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबी कमी झाल्याचे वर्ल्ड बँकेने म्हटले आहे.