Join us

व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 11:31 IST

Vodafone Idea and BSNL : व्होडाफोन आयडियामधील सरकारचा हिस्सा ४९ टक्के इतका झाला आहे. यानंतर व्हीआय बीएसएनएलमध्ये विलीन होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Vodafone Idea and BSNL : गेल्या आठवड्यात व्होडाफोन आइडियाने कर्जाच्या बदल्यात सरकारला कंपनीत हिस्सेदारी दिली. व्हीआयमध्ये सरकारचा हिस्सा आता ४९ टक्के इतका झाला आहे. यानंतर व्होडाफोन आयडिया आणि देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल यांचे विलीनीकरण होणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एकीकडे टाटा कंपनीच्या सहकार्याने सरकार बीएसएनएलला पुनरुज्जीवित करत आहे. तर दुसरीकडे, व्होडाफोन आयडिया आपल्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारकडे सध्या व्हीआयमध्ये ४९ टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होऊ शकते, अशी चर्चा आहे. या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया काय म्हणाले?ईटीला दिलेल्या मुलाखतीत, दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना विचारण्यात आले की बीएसएनएल आणि व्हीआचे विलीनीकरण करण्याची काही योजना आहे का? यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. "सध्या तरी असा कोणताही विचार नाही. जर अशा बातम्या येत असतील तर त्या चुकीच्या आहेत. सरकार बीएसएनएल आणि व्हीआयचे विलीनीकरण करणार नाही" अशी प्रतिक्रिया ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. सरकार व्हिआयमध्ये आणखी हिस्सा वाढवणार का? यावरही सिंधिया यांनी स्पष्ट उत्तर दिले. सरकार आता व्होडाफोन आयडियामधील आपला हिस्सा वाढवणार नाही. ते म्हणाले की, सरकारकडे व्हीआयमध्ये आधीच ४९ टक्के हिस्सा आहे. जर हिस्सा वाढला तर VI ही सरकारी कंपनी होईल.

व्हीआयच्या कर्जाबाबत काय?व्हीआयचे समायोजित एकूण महसूल शिल्लक आणि स्पेक्ट्रम देयके अजूनही जास्त असून लवकरच त्याची परतफेड करावी लागेल. यावर उत्तर देताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, कंपनीला या समस्येचा सामना करावा लागेल. इक्विटी रिलीफ ऑफरचा लाभ घेतला गेला आणि मी तो ४९ टक्क्यांमध्ये रूपांतरित केला आहे. अन्यथा व्हीआय सार्वजनिक कंपनी झाली असते. उर्वरित कर्ज कंपनीलाच फेडावे लागणार असल्याचे सिंधिया यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार आता कंपनीतील आपला हिस्सा वाढवण्याच्या मनःस्थितीत नाही. कंपनीला थकबाकीची रक्कम भरावी लागेल.

वाचा - टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम

बीएसएनएलबाबत योजना काय आहे?ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, बीएसएनएलने १८ वर्षांनंतर २६२ कोटी रुपयांचा तिमाही निव्वळ नफा नोंदवला आहे. ७२ तिमाहीत निव्वळ तोटा नोंदवल्यानंतर हे एक मोठं यश आहे. आता सरकार बीएसएनएलच्या ४जी रोलआउटवर वेगाने काम करत आहे. ते म्हणाले की, आजपर्यंत आम्ही सुमारे ९०,००० टॉवर बसवले आहेत, त्यापैकी ७६,००० टॉवर कार्यरत आहेत. आम्ही आता शेवटच्या टप्प्यावर काम करत आहोत. जुलैपर्यंत आम्ही सर्व १,००,००० टॉवर बसवू. एकदा ते पूर्ण झाले की, आम्ही सेवेची गुणवत्ता आणि इतर पॅरामीटर्स मोजण्याचा विचार करत आहोत. एक लाख टॉवर पुरेसे असतील का? यावर ते म्हणाले नाही. पण आधी तुम्ही १,००,००० टॉवर्स बसवा आणि पाया मजबूत करा. पुढे नेटवर्क वाढवता येईल.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)बीएसएनएलज्योतिरादित्य शिंदे