नवी दिल्ली : एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेमध्ये यंदा कोणत्याही अडचणी येणार नाहीत, कारण अनेक जणांनी ही विमान कंपनी घेण्यात स्वारस्य दाखविले आहे, असा दावा नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवारी केला.
आखाती देश, आशिया व युरोपमधील काहींनी एअर इंडियामध्ये रस दाखविला आहे, असे सांगून पुरी म्हणाले की, ही कंपनी बंद पडू नये, अशीच सरकारची इच्छा आहे. ही सरकारी कंपनी कोणीही विकत घेतली, तरी तिचे नाव एअर इंडिया हेच राहणार आहे. एअर इंडियातील कर्मचाऱ्यांनी निर्गुंतवणुकीमुळे घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही, त्यांच्या हिताला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल, असे सांगून हरदीपसिंग पुरी म्हणाले की, गेली अनेक वर्षे ही कंपनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. त्यामुळे निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. असे करताना कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही, याची पूर्ण खबरदारी केंद्र सरकार घेणार आहे.