Join us  

तब्बल ४,११५ कोटींवर कंपनीने सोडले पाणी, Byju's मध्ये होती 'प्रोसस'ची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 1:52 PM

गुंतवणूक संस्था असलेल्या प्रोससचे ४९३ दशलक्ष डॉलर म्हणजेच तब्बल ४,११५ कोटी रुपये बुडाले आहेत.

आर्थिक संकटात असलेली शैक्षणिक तंत्रज्ञान (एडटेक) कंपनी बायजूसमधील प्रोससचा हिस्सा शून्य झाली आहे. गुंतवणूक संस्था असलेल्या प्रोससचे ४९३ दशलक्ष डॉलर म्हणजेच तब्बल ४,११५ कोटी रुपये बुडाले आहेत.

प्रोससने आपल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. प्रोससचा बायजूजमध्ये ९.६ टक्के हिस्सा होता. हा सर्व हिस्सा प्रोससने राईट ऑफ केला आहे. त्यामुळे ही सर्व गुंतवणूक आता बुडाली आहे, असे प्रोससने अहवालात म्हटले आहे. प्रोससच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'बायजूसची वित्तीय स्थिती, कर्ज आणि भविष्यातील दृष्टिकोन याबाबत पुरेशी माहिती आमच्याकडे नाही.' याआधी २१ मे रोजी वित्तीय संस्था एचएसबीसीने बायजूसच्या भवितव्याबाबत गंभीर संशय व्यक्त करीत कंपनीचे मूल्यांकन शून्य केले होते.

प्रोससनेही वित्त वर्ष २०२४ च्या अखेरीस बायजूजचे मूल्यांकन शून्य केले होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये बायजूसने मात्र आपले अधिकृत मूल्यांकन २२ अब्ज डॉलरपेक्षा अधिक असल्याचे म्हटले होते. प्रोसस आणि पीक एक्सव्ही यांसारखे बायजूजच्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले आहे. राइट्स इश्यूच्या माध्यमातून २०० दशलक्ष डॉलर उभे करण्याच्या कंपनीच्या निर्णयासही गुंतवणूकदारांनी विरोध केला आहे.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूक