गेल्या काही महिन्यांपासून देशातील आयटी जायंट इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती (NR Narayana Murthy) चर्चेत आहेत. त्यांनी आठवड्यातून 70 तास काम (70 Hours Work A Week) करण्याचा सल्ला देशातील तरुणांना दिला होता, ज्यामुळे काहींनी त्यांच्यावर टीका केली तर काहींनी समर्थन केले. दरम्यान, आता नारायण मूर्ती यांनी त्या वक्तव्याचा पश्चाताप नसल्याचे म्हटले आहे.
'आपल्याला अधिक प्रोडक्टिव्ह व्हावे लागेल'
नारायण मूर्ती यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान सांगितले की, मला माझ्या त्या वक्तव्याचा कोणताही पश्चाताप नाही. माझ्या वक्तव्यातील 70 तास महत्त्वाचे नव्हते, तर आपल्याला अधिक प्रोडक्टिव्ह व्हावे होणे महत्वाचे आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जपान आणि जर्मनीने जे केले, तशाप्रकारचे काम करावे लागेल. ज्या लोकांना सरकारी लाभ मिळतो, त्यांनी समाजाच्या भल्यासाठी अधिक मेहनत करावी, असंही ते यावेळी म्हणाले.
निवृत्त होण्यापूर्वी मी दर आठवड्याला 85-90 तास काम करायचो. ज्यांना या देशाने खूप काही दिलं आहे, त्यांनी देशातील गरिबांचे जीवन सुधारण्यासाठी आणि देशासाठी अधिक योगदान देण्याची जबाबदारी आहे. नारायन मूर्ती यांच्या वक्तव्यावर त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती (Sudha Murthy) म्हणाल्या की, आमच्या दोघांसाठी काम करणे नेहमीच आनंददायी होते. या वयातही मी 70 तासांपेक्षा जास्त काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घ्या, मग कामाचा दिवसही सुट्टी वाटेल.