Join us

इन्शुरन्स पॉलिसी घेतल्यावर पश्चात्ताप करण्याची गरज नाही, ३० दिवसांसाठी घेता येणार ट्रायल, IRDAI चा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 3:24 PM

अनेकदा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेता आणि नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होतो. परंतु आता स्वत:ला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून इन्शुअर करणं अधिक सोप होण्याची शक्यता आहे.

अनेकदा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेता आणि नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होतो. परंतु आता स्वत:ला इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून इन्शुअर करणं अधिक सोप होण्याची शक्यता आहे. विमा नियामक संस्था IRDAI गेल्या काही काळापासून विमा क्षेत्राची व्याप्ती वाढवणं आणि ग्राहकांसाठी ते सुलभ बनविण्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यासाठी पॉलिसी परत करण्याचे नियम सोपे केले जात आहेत. आता याबाबत इरडाकडून नवा प्रस्ताव आला आहे. इरडानं 'फ्री लुक' कालावधी ३० दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे.

 

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानं (IRDAI) एक मसुदा जारी केला आहे आणि विम्याशी संबंधित विविध नियमांच्या अनेक तरतुदी एकत्रित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. पॉलिसीधारकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी "कोणत्याही मार्गानं मिळविलेल्या पॉलिसींचा फ्री-लूक कालावधी पॉलिसी दस्तऐवज प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांचा असेल," असं म्हटलं आहे. 

काय आहे प्रस्तावाचा अर्थ? 

विमा नियामक इरडानं बुधवारी पॉलिसी परत घेण्याचा 'फ्री लूक' कालावधी १५ दिवसांवरून ३० दिवसांपर्यंत वाढवण्याचा आणि जीवन विमा पॉलिसींसाठी नोंदणी अनिवार्य करण्याचा प्रस्ताव दिला आहे. सध्या, जर विमाधारक पॉलिसीच्या अटी व शर्तींशी समाधानी नसेल, तर तो पॉलिसी दस्तऐवज मिळाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या 'फ्री लूक' कालावधीत त्यातून पैसे काढू शकतो. तर इलेक्ट्रॉनिक पॉलिसीच्या बाबतीत हा कालावधी ३० दिवसांचा असतो. 

म्हणजेच, जर तुम्ही एजंटकडून विमा पॉलिसी घेतली असेल, परंतु ती विकत घेतल्यानंतर तुम्हाला वाटलं की त्यात अशा अनेक अटी आहेत ज्या तुम्हाला अनुकूल नाहीत किंवा तुम्हाला पॉलिसीमध्ये जास्त फायदा दिसत नाही, तर तुम्ही ती १५ दिवसांच्या आत परत करू शकता. परंतु जर इरडाचा प्रस्ताव पास झाला तर ते परत करण्यासाठी तुमच्याकडे ३० दिवसांचा कालावधी असेल. 

याशिवाय, इरडानं या मसुद्यात पॉलिसी जारी करण्यासाठी नामनिर्देशित व्यक्तीचा उल्लेख करणं अनिवार्य करण्याबाबतही सांगितलं आहे.

टॅग्स :व्यवसाय