नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये देशात इंटरनेट वाढीचा दर माेठ्या प्रमाणात वाढला हाेता. ५जी तंत्रज्ञानामुळे त्यात आणखी वाढ हाेईल, असे अपेक्षित हाेते. मात्र, यावर्षी प्रत्यक्षात हा दर कमी झाला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, भारतात प्रारंभिक आणि मध्यम श्रेणीच्या स्मार्टफाेनची घटलेली विक्री. वर्ष २०२२मध्ये स्मार्टफाेनची विक्री १० टक्के घटली आहे. परिणामी इंटरनेटचा विकास दर त्या वर्षात ४ टक्क्यांनी घटला आहे.
‘इंटरनॅशनल डेटा काॅर्पाेरेशन’ने (आयडीसी) यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये स्मार्टफाेनची विक्री १० टक्क्यांनी घटली आहे. स्मार्टफाेनची विक्री काेराेनाकाळात वाढली हाेती. मात्र, याबाबतीत आता भारत २०१९च्या पातळीवर आला आहे. ‘ट्राय’च्या आकडेवारीनुसार २०१६ ते २०२० या कालावधीत इंटरनेट वाढीचा दर दाेन आकडी हाेता. मात्र, ताे आता एकेरी आकड्यात आला आहे.
मधल्या काळात चिपचा तुटवडा हाेता. त्यामुळे उत्पादन घटले हाेते. त्याचा माेठा परिणाम विक्रीवर झाला. दुसरी बाब म्हणजे, चिप क्षमतेला हायटेक स्मार्टफाेनमध्ये परिवर्तित केले आहे. त्यामुळेच महागड्या स्मार्टफाेनची विक्री वाढली आहे. त्या तुलनेत स्वस्त व मध्यम श्रेणीच्या स्मार्टफाेनची विक्री घटली आहे.
किती लाेक वापरतात इंटरनेट?
६५ काेटी भारतीयांकडे किमान एक स्मार्टफाेन आहे. ५१ काेटी इंटरनेट वापरकर्ते भारतात आहेत. गेल्या डिसेंबरपासून हा आकडा
फार वाढलेला नाही. ८ काेटी ग्रामीण युझर्स व्हीडिओ पाहतात किंवा ऑनलाईन क्लासेसमध्ये सहभागी हाेतात. काॅमस्काेरच्या आकडेवारीनुसार, नियमित इंटरनेट वापरणारे सर्व ६५ काेटी भारतीय जरी इंटरनेट वापरकर्ते असले तरीही ५० टक्क्यांपेक्षा जास्त लाेकसंख्या इंटरनेटपासून लांब आहे. त्यापैकी १४ वर्षांखालील ३५.२ काेटी लाेकसंख्या वगळली तरीही सुमारे ४० टक्के लाेकांकडे स्मार्टफाेन नाही.