नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सामान्यांना दिलासा देणार, नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 6-10 रुपयांनी कपात होणार, अशी बातमी 2023 च्या शेवटच्या आठवड्यात आली होती. पण, आता सरकारनेच या बातम्यांचे खंडन केले आहे. या नववर्षात पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलीही कपात होणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारचा सामान्यांना धक्काकेंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या वृत्ताला पूर्णविराम दिला आहे. पुरी यांनी बुधवारी सांगितले की, इंधनाच्या (पेट्रोल-डिझेल) किमती कमी करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, ही केवळ अफवा आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जवळपास 40-80 टक्क्यांनी वाढल्या आहेत. पाश्चात्य देशांमध्येही किमती वाढल्या आहेत. पण, आपल्याकडे भाव अजूनही कमी आहेत. दूरदर्शी नेतृत्वामुळेच आपण हे करू शकलो आहोत. नोव्हेंबर 2021 आणि मे 2022 मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान, हरदीप सिंग पुरी यांच्या या वक्तव्यानंतर तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक वाढ झाली. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या शेअर्समध्ये 3.27% ची वाढ नोंदवण्यात आली. तर BPCL शेअर्स 1.06% आणि IOCL शेअर्स 1.76% वाढले. दरम्यान, मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या वेळी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले होते.
मुंबई-दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दरइंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) वेबसाइट iocl.com नुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर दिल्ली ते कोलकाता पर्यंत स्थिर आहेत. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये तर डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर आहे, तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर आहे.