नवी दिल्ली : महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यानंतर त्यावर जे व्याज मिळेल त्यावर टीडीएस लागणार नसून, त्याऐवजी खातेधारकाच्या लागू असलेल्या टॅक्स ब्रॅकेटच्या आधारावर कर आकारला जाईल. मंगळवारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) याबाबतची घोषणा केली.
आर्थिक वर्ष २३मध्ये सादर करण्यात आलेल्या या योजनेत वर्षाला कमाल २ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. त्यावर वार्षिक व्याज दर ७.५ टक्के आहे. या योजनेचा कालावधी २ वर्षांचा आहे. यामध्ये किमान १ हजार रुपये जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. कलम १९४ए अंतर्गत या योजनेत ४० हजारपेक्षा अधिक व्याज मिळाले तर त्यावर टीडीएस लागू होईल.
याबाबत नांगिया एंडरसन इंडियाचे नीरज अग्रवाल म्हणाले, महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेद्वारे ७.५ टक्के व्याजदरानुसार, वर्षभरात कमाल १५ हजार, तर दोन वर्षांत कमाल ३२ हजार रुपये व्याज मिळते. टीडीएस कपात ही ४० हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्नावर केली जाते. दरम्यान, महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक केल्यास प्राप्तिकर नियम ८० सी नुसार वार्षिक दीड लाखांपर्यंत बचत करता येते.
काय आहे योजना? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात महिला सन्मान प्रमाणपत्र योजनेबाबत घोषणा केली आणि १ एप्रिलपासून ही योजना सुरू झाली.कोणत्याही वयोगटातील महिलेला या योजनेत गुंतवणूक करता येते. तसेच यातील गुंतवणूक ही मुदत ठेवीप्रमाणे समजली जाते.एक हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम या योजनेत गुंतवता येत असून, त्यावर ७.५ टक्के व्याज दिले जाते. गुंतवणुकीवरील व्याज दर तीन महिन्यांनी खात्यात जमा केले जातात.या योजनेची मॅच्युरिटी पिरिएड दोन वर्षे असला, तरी एक वर्षानंतर योजनेतून ठरावीक रक्कम काढता येते.कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा पोस्ट कार्यालयातून या योजनेचा लाभ घेता येईल.