Join us

अडीच लाखांच्या ठेवींना नो टेन्शन!

By admin | Published: February 07, 2017 1:54 AM

नोटाबंदीनंतर बँकेत जमा केलेल्या अडीच लाखांपर्यंतच्या ठेवींची चौकशी केली जाणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर बँकेत जमा केलेल्या अडीच लाखांपर्यंतच्या ठेवींची चौकशी केली जाणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. ज्यांच्या प्राप्तिकर विवरण पत्रांचा आणि बँकेतील मोठ्या ठेवींचा हिशेब लागणार नाही, त्यांचीच चौकशी केली जाईल, असेही प्राप्तिकर विभागाने नमूद केले आहे.प्राप्तिकर विभागाने विविध बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींची सर्व माहिती मिळवली असून, त्याचे विश्लेषण करणे सुरू आहे. ज्यांनी एक कोटी वा त्याहून अधिक रुपये जमा केले आहेत आणि ज्यांच्या आधीच्या वर्षाच्या प्राप्तिकर विवरण पत्राशी अशा मोठ्या रकमांचा ताळमेळ जमत नसेल, तर त्यांची निश्चितच चौकशी करण्यात येणार आहे. सेंट्रल बोर्ड आॅफ डायरेक्ट टॅक्सचे चेअरमन सुशील चंद्रा यांनी सीआयआयने अर्थसंकल्पाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या चर्चासत्रात ही माहिती दिली.ते म्हणाले की, बँक खातेदारांनी २ लाख ते ८0 लाख रुपयांपर्यंत जमा केलेल्या रकमा आणि बँकेत ८0 लाखांहून अधिक भरलेली रक्कम अशी वर्गवारी आम्ही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच अडीच लाखांपर्यंतच्या जमा केलेल्या ठेवींची चौकशी केली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आम्ही सध्या तशा रकमांचा विचार करीत नाही. पाच लाखांची रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीने गेल्या तीन वर्षांत प्राप्तिकर विवरण पत्रे सादर केली नसल्यास त्यांची चौकशी होणार आहे, असे सुशील चंद्रा यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)