मुंबई : भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रातील मानाचे पान असलेल्या एअर इंडियाची विक्री करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कंपनीच्या मुंबईतील मुख्यालयात असलेल्या कला दालनात सुमारे आठ हजार दुर्मीळ व मौल्यवान वस्तू ठेवल्या असून, आतापर्यंत त्यांची यादी केली गेलेली नाही. तसेच त्यांच्या किमतीचे मूल्यांकनही कधी झालेले नाही, असे माहिती अधिकाराखाली उघड झाले आहे. या कला खजिन्याचे मूल्यमापन करून त्याची रक्कम एअर इंडियाच्या मालमत्तेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी जोर धरीत आहे.सरकारी मालकीची हवाई वाहतूक कंपनी असलेल्या एअर इंडियावर ६० हजार ७४ कोटी रुपयांचे कर्ज असल्याने या कंपनीची विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या विक्रीसाठी जागतिक निविदा मागविण्याची प्रक्रिया जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा सुरू करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या कला दालनातील समृद्ध आणि दुर्मीळ ठेवा या विक्रीमध्ये समाविष्ट होणार अथवा नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.मुंबई येथील एअर इंडियाच्या इमारतीतील कलादालन अनेक दुर्मीळ आणि किमती वस्तू तसेच चित्र, शिल्प यांनी समृद्ध आहे. येथे सुमारे ८ हजार वस्तू ठेवलेल्या आहेत. एअर इंडियाला भेट देणाºया अनेकांना हे कलादालन भुरळ घालते. या कलादालनातील विविध वस्तूंची किंमत किती असेल याबाबत अनेक अंदाज वर्तविले जात असले तरी सरकारकडून मात्र आजतागायत या कला खजिन्याचे मूल्यमापनच केले गेले नसल्याचे माहिती अधिकार कायद्याखाली विचारण्यात आलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर येथे ठेवण्यात आलेल्या विविध वस्तूंची यादीही आजपर्यंत करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.कलादालनात आहेत अनमोल चित्रे, शिल्पेमुंबईच्या एअर इंडिया इमारतीला ज्यांनी भेट दिली आहे त्यांनी तेथील कलादालन निश्चितच पाहिले असेल. या कलादालनामध्ये जगप्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसेन, व्ही.एस. गायतोंडे, के.एच. आरा आणि किशन खन्ना यांची सुंदर चित्रे आहेत. याशिवाय येथे बी. विठ्ठल, पिलू पोचखानवाला, पी. जानकीतन यांच्यासारख्या अनेक शिल्पकारांनी बनविलेली सुमारे २५०० आधुनिक तसेच पारंपरिक शिल्पे आहेत.या कलादालनात याशिवाय विविध प्रकारची वस्रप्रावरणे ठेवण्यात आलेली आहेत. त्यामध्ये ‘श्रीनगर’ हे सुप्रसिद्ध कलेक्शन असून, याशिवाय देशात बनत असलेल्या विविध प्रकारच्या वस्रांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय तसेच अनेक परदेशी नागरिकांनी या कलादालनाला भेट दिली असून, येथील हा मौल्यवान ठेवा पाहून त्यांच्या डोळ्यांचे पारणे नक्कीच फिटलेले आहे.
एअर इंडियाकडील चित्रे, शिल्पांचे मूल्यांकनच नाही, माहिती अधिकारातून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 4:01 AM