Noel Tata Update : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या जाण्यानंतर टाटा ट्रस्टची जबाबदारी त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नोएल टाटा यांना टाटांच्या दोन्ही प्रमुख ट्रस्टचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. म्हणजे संपूर्ण टाटा समूह आता त्यांच्या ताब्यात आहे. पण, सर्व समूहातील कंपन्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या कंपनीचे नोएल टाटा कधीही अध्यक्ष होऊ शकत नाहीत. टाटा सन्स ही एकमेव कंपनी आहे, जी टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांवर नियंत्रण ठेवते. पण, नोएल टाटा या कंपनीचे म्हणजेच टाटा सन्सचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत.
टाटा सन्सचे अध्यक्ष होण्यासाठी नोएल टाटा यांच्या मार्गात अडथळे येण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुमारे १३ वर्षांपूर्वी देखील टाटा सन्सच्या अध्यक्षपदाने नोएल टाटा यांना हुलकावणी दिली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, २०११ मध्ये रतन टाटा यांनी टाटा सन्सचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ही जबाबदारी नोएल यांच्याकडे द्यावी, अशी जोरदार चर्चा झाली होती. पण नंतर हे पद नोएल टाटा यांचे मेहुणे सायरस मिस्त्री यांना देण्यात आले. यानंतर २०१९ मध्ये नोएल यांना सर रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त बनवल्यानंतर ते टाटा सन्सचे अध्यक्ष बनवण्याची चर्चा होती. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांना सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त करण्यात आले. मात्र, टाटा सन्सचे अध्यक्षपद त्यांच्यापासून दूरच राहिले.
रतन टाटांनी बनवलेला कायदा ठरतोय अडसर
रतन टाटा हयात असेपर्यंत नोएल यांना यांना टाटा सन्सचे अध्यक्ष होण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत २०२२ मध्ये रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने एक कायदा केला. आता नोएल टाटा या समूहाचे नेतृत्व करत असल्याने त्यांना पुन्हा एकदा टाटा सन्सचे अध्यक्ष होण्याची संधी चालून आली होती. मात्र, २०२२ मध्ये केलेला कायदा त्यांच्या मार्गात अडसर ठरतोय.
काय आहे टाटांचा कायदा?
हितसंबंधांचा संघर्ष टाळण्यासाठी, टाटा सन्सने २०२२ मध्ये त्यांच्या आर्टिकल ऑफ असोसिएशन बदलले होते. या अंतर्गत टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्स या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष एकाच वेळी एक व्यक्ती असू शकत नाही. नोएल टाटा सध्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. या कायद्यामुळे त्यांना टाटा सन्सचे अध्यक्ष होता येणार नाही. रतन टाटा हे टाटा कुटुंबातील शेवटचे सदस्य होते, जे एकाच वेळी दोन्ही संस्थांचे अध्यक्ष होते.
टाटा सन्स इतकी महत्त्वाची का?
टाटा सन्स ही टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांची होल्डिंग संस्था आहे. याचा अर्थ या सर्व कंपन्यांमध्ये टाटा सन्सचा मोठा हिस्सा आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाटा ट्रस्टची टाटा सन्समध्ये ६६ टक्के भागीदारी आहे. या दृष्टिकोनातून, टाटा ट्रस्टचे अध्यक्ष संपूर्ण समूहावर नियंत्रण ठेवतात. परंतु, टाटा सन्सच्या अध्यक्षांना समूह कंपन्यांमध्ये थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. यामुळेच रतन टाटा यांनी असा कायदा केला होता की एकाच व्यक्तीला दोन्ही पदे एकाच वेळी सांभाळता येणार नाहीत.