लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नोएल टाटा यांची ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड करण्यात आली. नोएल हे सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टचे एक विश्वस्त (ट्रस्टी) आहेत. टाटा समूहातील किरकोळ विक्री व्यवसाय कंपनी ट्रेंटचे अध्यक्ष आहेत.
टाटा इंटरनॅशल लि., व्होल्टास व टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांचेही ते चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटनचे ते व्हॉइस चेअरमन आहेत. टाटा समूहासोबत ते ४० वर्षांपासून काम करीत आहेत.
रतन टाटा यांच्याशी नोएल यांचे नाते काय?
नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. वडील नवल टाटा यांनी दोन विवाह केले होते. पहिली पत्नी सुनी यांच्यापासून त्यांना रतन आणि जिम्मी अशी दोन मुले झाली. हे दोघेही अविवाहित राहिले. सुनी टाटा यांच्याशी घटस्फोटानंतर नवल टाटा यांनी स्विट्जरलँडची बिझनेस वूमन सिमोन यांच्याशी १९५५ मध्ये दुसरा विवाह केला. सिमोन यांच्यापासून त्यांना नोएल हा मुलगा झाला. नोएल यांचा विवाह आलू मिस्त्री यांच्याशी झाला. आलू या सायरस यांची बहीण व पालनजी मिस्त्री यांची कन्या. नोएल यांना लीह, माया, नेवाईल अशी ३ अपत्ये आहेत.