नुकतंट रतन टाटा यांचं निधन झालं. टाटा समूहाचे ते मानद अध्यक्ष होते. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (६७) यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली. टाटा ट्रस्ट ही मूळची टाटा सन्सची मालक आहे. त्यांच्याकडे होल्डिंग कंपनीत ६६ टक्के हिस्सा आहे. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा यांची सून मानसी यांची ओळख करून देत आहोत.
मानसी यांचा विवाह नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल टाटा यांच्याशी झाला आहे. पुण्यातील दिवंगत उद्योगपती विक्रम किर्लोस्कर आणि गीतांजली किर्लोस्कर यांच्या त्या कन्या आहेत. मानसी किर्लोस्कर या किर्लोस्कर घराण्यातील सदस्य आहेत. हे कुटुंब किर्लोस्कर समूहाचं कामकाज चालवते. किर्लोस्कर समूह हा टाटा समूहाइतकाच जुना आहे. संस्थेचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी १८८८ मध्ये याची स्थापना केली.
२०१९ मध्ये पार पडला विवाह
मानसी किर्लोस्कर यांचा जन्म ७ ऑगस्ट १९९० रोजी झाला. त्यांनी अमेरिकेतील ऱ्होड आयलंड स्कूल ऑफ डिझाइनमधून फाइन आर्ट्समध्ये पदवी घेतली आहे. २०१९ मध्ये मानसी यांनी रतन टाटा यांच्या कुलाबा येथील निवासस्थानी एका खासगी समारंभात नोएल टाटा यांचा मुलगा नेव्हिल यांच्यासोबत विवाह केला. मानसी आणि नेव्हिल आता दोन मुलांचे पालक आहेत. जमशेद टाटा आणि तियाना टाटा अशी त्यांची नावं आहेत.
वडिलांच्या निधनानंतर सांभाळली जबाबदारी
टोयोटा किर्लोस्कर ऑटो पार्ट्स (TKAP) आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) च्या उपाध्यक्षपदी मानसी किर्लोस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड (TIEI), किर्लोस्कर टोयोटा टेक्सटाइल प्रायव्हेट लिमिटेड (KTTM), टोयोटा मटेरियल हँडलिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (TMHIN) आणि डेनो किर्लोस्कर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (DNKI) या कंपन्यांच्या अध्यक्ष म्हणूनही त्या कार्यरत आहेत.