ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - फिनलॅंडची मोबाइल निर्माती कंपनी नोकियाने बार्सिलोनामध्ये झालेल्या मोबाइल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये ग्राहकांच्या खास पसंतीस उतरलेला फोन 'नोकिया 3310' रिलॉन्च केला. या फोनची किंमत 4,152 रुपये इतकी असणार असल्याची घोषणा कंपनीने केली असली तरी या फोनच्या एका व्हॅरिअंटची किंमत तब्बल 1 लाख 13 हजार रूपये असणार आहे.
अनेक स्मार्टफोनचे लिमिटेड एडिशन बनवणा-या कॅवियर या कंपनीने नोकिया 3310 या फोनचे लिमिटेड एडिशन तयार केले आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर या फोनची प्री बुकिंग सुरू केली आहे. कंपनीने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यामुळे प्रेरित होऊन सुप्रिमो पुतिन या नावाने हा फोन बनवला आहे. फोनच्या मागील बाजूस सोन्याच्या पट्टीमध्ये पुतिन यांचा फोटो आहे तसेच रशियाच्या राष्ट्रगीताची एक ओळही सोन्याचा वापर करून लिहीली आहे. याशिवाय फोनच्या समोरच्या बाजूस एक सोन्याचं बटनही देण्यात आलं असून त्यावर रशियाच्या सैन्याचं चित्र आहे. या फोनमध्ये ब्लॅक वेल्वेटसह लाकडाची कडा देण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त नोकिया 3310 मध्ये असलेले सर्व फीचर या स्पेशल फोनमध्ये देण्यात आले आहेत. 17 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये हा मोबाइल पहिल्यांदा भारतात लाँच करण्यात आला होता. त्यावेळी या मोबाइलला ग्राहकांनी पसंती दर्शविली होती. तसेच, मोठ्या प्रमाणात खरेदीसुद्धा केली होती. नोकिया एकेकाळी मोबाइल प्रॉडक्ट्मधली सर्वात विश्वसनीय कंपनी मानली जायची. मात्र नंतर अनेक मोबाईल कंपन्यांचे स्मार्टफोन्स आले. त्यामुळे नोकियाचे लहान फोन मागे पडले. त्यानंतर नोकियाचे अँड्रॉईड फोनसुद्धा मार्केटमध्ये आले.