nokia deal with bharti airtel : देशात एक काळ असा होता की मोबाईल म्हटलं की फक्त 'नोकिया' नाव घेतलं जायचं. देशात जवळपास ८० टक्के लोकांकडे नोकिया फोन होते. मात्र, कालांतराने भारतीय बाजारपेठेत नवीन स्पर्धक आले आणि नोकियाला घरघर लागली. त्यानंतर भारतीय मार्केटमध्ये येण्यासाठी नोकियाने अनेक प्रयत्न केले. मात्र, एकही यशस्वी होऊ शकला नाही. आता पुन्हा एकदा नोकिया भारतात एन्ट्रीसाठी सज्ज झाला आहे. यावेळी नोकियाने मोठी खेळी खेळली आहे. फिनलंडची कंपनी नोकियाने भारती एअरटेलसोबत दीर्घकाळासाठी अनेक अब्ज डॉलर्सचा करार केल्याची माहिती दिली आहे.
या अंतर्गत नोकिया भारतातील प्रमुख शहरे आणि राज्यांमध्ये 4G आणि 5G उपकरणे बसवणार आहे. या करारानुसार, नोकिया त्याच्या 5G एअरस्केल पोर्टफोलिओमधून उपकरणे बसवणार आहे. यामध्ये बेस स्टेशन्स, बेसबँड युनिट्स आणि विशाल MIMO रेडिओच्या लेटेस्ट जनरेशन समावेश आहे. हे सर्व 'रीफशार्क सिस्टम-ऑन-चिप तंत्रज्ञान'द्वारे चालणार आहे. भारती एअरटेलने देशातील प्रमुख शहरे आणि राज्यांमध्ये 4G आणि 5G उपकरणे बसवण्यासाठी नोकियासोबत अब्जावधी डॉलरचा करार केल्याने सांगितले आहे.
एअरटेलची 5G नेटवर्क क्षमता वाढणार
नोकियाचे तंत्रज्ञान मिळाल्यानंतर 5G क्षमता आणि कव्हरेजसह एअरटेलचे नेटवर्क वाढणार आहे. नोकिया एअरटेलचे विद्यमान 4G नेटवर्क मल्टीबँड रेडिओ आणि बेसबँड उपकरणांसह आधुनिकीकरण करेल. जे 5G ला देखील सपोर्ट देऊ शकतात. नोकिया सोबतचा हा करार आमच्या नेटवर्क पायाभूत सुविधांना बळ देणारा असून भविष्यात वापरकर्त्यांना याचा चांगला अनुभव मिळणार आहे. एअरटेलचे वेगवान इंटरनेट आणि चांगलं नेटवर्क आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचण्या मदत होईल, अशी माहिती भारती एअरटेलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गोपाल विट्टल यांनी दिली.
नोकियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पेक्का लुंडमार्क म्हणाले की, या धोरणात्मक करारामुळे कंपनीचे भारतात अस्तित्व आणखी मजबूत होईल. याशिवाय एअरटेलसोबतचे दीर्घकालीन सहकार्यही मजबूत होईल.