Join us

आनंद महिंद्रा आता RBI साठी काम करणार; TVS च्या वेणू श्रीनिवासनसह संचालकपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 3:37 PM

आनंद महिंद्रा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींची नियुक्ती रिझर्व्ह बँकेवर करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच काही उद्योगपतींना आपल्या केंद्रीय बोर्डावर घेतले आहे. यासंदर्भात RBI ने माहिती दिली आहे. यामध्ये आनंद महिंद्रा, पंकज. आर. पटेल, प्राध्यापक रवींद्र एच. ढोलकिया आणि वेणू श्रीनिवासन यांचा समावेश असून, त्यांची केंद्रीय बोर्डावर अशासकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. 

आनंद महिंद्रा सध्या महिंद्रा समूहाचे अध्यक्ष असून ते महिंद्रा अँड महिंद्रा आणि टेक महिंद्राचे बिगर कार्यकारी अध्यक्ष देखील आहेत. याशिवाय, टीव्हीएस मोटर कंपनीचे चेअरमन वेणू श्रीनिवासन आणि झायडस लाइफसायन्सेसचे चेअरमन पंकज आर पटेल यांचाही रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डात समावेश करण्यात आला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे (आयआयएम-अहमदाबाद) माजी प्राध्यापक रवींद्र एच. ढोलकिया यांनाही बोर्डात सहभागी करून घेण्यात आले आहे. 

चार वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती

आरबीआयच्या अधिसूचनेनुसार, नियुक्ती समितीने (एसीसी) चार वर्षांच्या कालावधीसाठी या नियुक्ती केल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या अध्यक्षतेखालील मंडळाचे सदस्य, भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यानुसार भारत सरकार नियुक्त करतात. एमपीसीच्या कम्फर्ट बँड २-६ टक्क्यांपर्यंत महागाई कमी करण्यासाठी आरबीआय कॅलिब्रेटेड, केंद्रित पावले उचलेल, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले. दास म्हणाले की, युद्धामुळे प्रत्येक दिवसागणिक नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. युरोपमधील युद्ध रेंगाळत आहे, पुरवठा साखळीच्या समस्यांवर जोर देत आहे. महामारी आणि युद्ध असूनही पुनर्प्राप्तीला गती मिळत आहे. दुसरीकडे महागाई जागतिक झाली आहे, असे दास यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, अलीकडेच मध्यवर्ती बँकेने आपल्या शेवटच्या एमपीएसी बैठकीत रेपो दर ५० बेस पॉइंट्सने वाढवून ४.९० टक्के करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, स्थायी ठेव सुविधा (एसडीएफ) ४.६५ टक्के आणि सीमांत स्थायी सुविधा (एमएसएफ) आणि बँक दर ५.१५ टक्क्यांवर समायोजित केले. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकआनंद महिंद्रा