Join us

TDS क्लेम करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक नाही; जाणून घ्या, कोणत्या करदात्यांना मिळणार 'ही' सूट?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 3:55 PM

PAN : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) जुलैमध्ये अनिवासी करदात्यांना कमी टीडीएसच्या लाभाचा क्लेम करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फॉर्म 10F भरणे अनिवार्य केले आहे.

नवी दिल्ली : आयकर विभागाने ज्यांच्याकडे परमानेंट अकाउंट नंबर (PAN) नाही, अशा अनिवासी करदात्यांना 31 मार्च 2023 पर्यंत फॉर्म 10F मॅन्युअली भरण्याची परवानगी दिली आहे. यामुळे अनिवासी करदात्यांना टीडीएस सवलतीसाठी आवश्यक असलेल्या या कामाचा भार कमी होईल आणि ते कमी टीडीएस (स्रोतावर कर वजा) दराचा क्लेम करू शकतील.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) जुलैमध्ये अनिवासी करदात्यांना कमी टीडीएसच्या लाभाचा क्लेम करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फॉर्म 10F भरणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, करदात्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फॉर्म भरताना समस्या येत होत्या, कारण आयकर पोर्टल ज्या करदात्यांजवळ पॅन नाही, त्यांना 10F फाइल करण्याची परवानगी देत ​​नव्हते.

सीबीडीटीने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, ज्या करदात्यांकडे पॅन नाही, अशा करदात्यांच्या समस्यांवर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या करदात्यांना 31 मार्च 2023 पर्यंत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने 10F भरण्यापासून सूट देण्यात येत आहे. आयकर कायद्याच्या संबंधित तरतुदीनुसार अशा करदात्यांना परमानेंट अकाउंट नंबर असणे आवश्यक नाही.

काय सांगतात एक्सपर्ट?12 डिसेंबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, "अशा श्रेणीतील करदात्यांना 31 मार्च 2023 पर्यंत हाताने 10F भरता येईल, जसे ते जुलैमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेपूर्वी करत होते." नांगिया अँडरसन एलएलपीमधील कर भागीदार संदीप झुनझुनवाला यांनी सांगितले की, "सीबीडीटी अधिसूचनेतून सूट दिल्याने अनिवासी भारतीयांसाठी अनुपालन ओझे कमी होईल, ज्याचा त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फॉर्म 10F भरण्यासाठी सामना करावा लागत होता. परंतु ही सूट 31 मार्च 2023 पर्यंतच आहे, त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा डिजिटल होईल, तेव्हा अनिवासी भारतीय याला कसे सामोरे जातील हे पाहणे मजेशीर असणार आहे."

जुलैमध्ये अनिवार्य करण्यात आले होते इलेक्ट्रॉनिक फाइलिंग जुलै 2022 मध्ये सीबीडीटीने आदेश जारी केला की, जर अनिवासी करदात्यांना कमी डीटीएसचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना फॉर्म 10F इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देखील भरावा लागेल. मात्र, अशा प्रकारे ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही अशा करदात्यांना फॉर्म भरता येणार नाही.

टॅग्स :पॅन कार्डव्यवसाय