नवी दिल्लीः घराच्या गृहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. लागोपाठ दुसऱ्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. तत्पूर्वी ऑगस्टमध्ये ग्राहकांना केलेल्या कपातीचा फायदा मिळाला होता. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना हा दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC)च्या माहितीनुसार, विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची बाजारातील किंमत आता 574.50 रुपये असेल. सिलिंडरचे हे नवे दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आले आहेत. तत्पूर्वी जुलैमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर 100.50 रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यामुळे दोन महिन्यात एकूण मिळून विनाअनुदानित प्रति गॅस सिलिंडरमध्ये 163 रुपयांची कपात करण्यात आली आहे.गेल्या महिन्यात विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 100.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. 1 जुलैपासून हे गॅस सिलिंडरचे हे नवे दर लागू करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात दरकपात झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत मजबूत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. एलपीजी 14.2 किलो किमतीच्या घरगुती गॅस सिलिंडरमध्येच ही दरकपात केली आहे. अनुदानित सिलेंडरची खरेदी करताना बाजारमूल्याप्रमाणे पैसे द्यावे लागणार आहेत. मात्र, सिलिंडरचे अनुदान बँकेत जमा झाल्यास प्रत्येक सिलेंडरसाठी 142.65 रुपये अनुदान मिळेल. आता ग्राहकांना नव्या दरानुसार सिलिंडर मिळणार आहे. वर्षाला 14.2 किलोचे 12 सिलिंडर ग्राहकाला उपलब्ध करून दिले जातात. त्यातच सबसिडीचे पैसे थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होतात.
मोदी सरकारनं घरगुती गॅस सिलिंडर केला स्वस्त; दरात मोठी कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 9:51 AM