Join us  

फेब्रुवारी अखेरपर्यंत संपणार नोटाटंचाई

By admin | Published: January 06, 2017 11:46 PM

नोटाबंदीमुळे निर्माण झालेली नोटांची टंचाई फेब्रुवारी अखेरपर्यंत संपेल, असा आशादायक अहवाल स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) दिला आहे.

मुंबई : नोटाबंदीमुळे निर्माण झालेली नोटांची टंचाई फेब्रुवारी अखेरपर्यंत संपेल, असा आशादायक अहवाल स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) दिला आहे. बँकांनी व्याजदर कमी केल्यामुळे गृहनिर्माण क्षेत्र पुन्हा एकदा भरारी घेईल, घरबांधणी वाढून गृहकर्जाच्या मागणीतही वाढ होईल, असा विश्वासही बँकेने व्यक्त केला आहे. ‘इकोरॅप : बेटिंग आॅफ क्रेडिट ग्रोथ’ या नावाचा एक अहवाल स्टेट बँकेने जाहीर केला. अहवालानुसार बँकांकडे प्रचंड प्रमाणात रोख जमा झाली आहे. त्याचवेळी कर्जाचा वृद्धीदर घसरला आहे. २३ डिसेंबरला संपलेल्या पंधरवड्यात सर्व शेड्यूल्ड बँकांची कर्जाची मागणी सार्वकालिक नीचांकावर येऊन ५.१ टक्का झाली. या काळात कर्ज उठाव फक्त ५,२२९ कोटींवर आला. त्याचवेळी बँकांकडे जमा असलेली रक्कम ४ लाख कोटी रुपये झाली. कर्जावरील व्याजदरात एका झटक्यात ९0 आधार अंकांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जाचा वृद्धीदर वाढेल. त्यातून गृहनिर्माण क्षेत्राला चालना मिळेल.स्टेट बँकेने १ जानेवारी रोजी व्याजदरात ९0 आधार अंकांची कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.अहवालात म्हटले आहे की, बंद करण्यात आलेल्या नोटांच्या ६७ टक्के नव्या नोटा अर्थव्यवस्थेत ओतण्यास रिझर्व्ह बँकेला जानेवारी अखेरपर्यंत यश येईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत ८0 ते ८९ टक्के नोटा अर्थव्यवस्थेत येतील. त्यामुळे नोटांची सध्याची टंचाई दूर होईल. (वाणिज्य प्रतिनिधी)अर्थ मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पाचशे आणि हजारांच्या नोटांचे अर्थव्यवस्थेतील एकूण मूल्य १५.४४ लाख कोटी रुपये होते.डिसेंबर अखेरपर्यंत त्यापैकी ४४ टक्के नोटा अर्थव्यवस्थेत आणण्यात आल्या होत्या. रिझर्व्ह बँक आताच्या गतीनेच नोटा छापत राहिली, तर फेब्रुवारी अखेरीस स्थिती सामान्य होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.