पॅरिस : फॅशन व सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती या क्षेत्रात जगप्रसिद्ध असलेल्या शनैल या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय वंशाच्या व कोल्हापूरच्या मूळ रहिवासी असलेल्या लीना नायर (वय ५२) यांची नियुक्ती करण्यात आली. ही घोषणा मंगळवारी करण्यात आली. याआधी लीना नायर या युनिलिव्हर कंपनीच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी (सीएचआरओ) म्हणून कार्यरत होत्या. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची धुरा सध्या भारतीय वंशीयांकडे आहे. त्या मालिकेत आता लीना नायर यांची भर पडली आहे. युनिलिव्हर कंपनीचे सीईओ ॲलन जोप यांनी सांगितले की, आमच्या कंपनीत गेल्या तीस वर्षांपासून लीना नायर यांनी अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आम्हाला आदर वाटतो. शनैल कंपनीने बनविलेले ट्विट सूट, क्विल्टेड हँडबॅग, नंबर ५ परफ्यूम आदी उत्पादने जगप्रसिद्ध आहेत. लीना नायर या कोल्हापूरच्या मूळ रहिवासी आहेत. त्या कोल्हापूरमधील होलीक्रॉस काॅन्व्हेंट शाळेत शिकल्या. त्यानंतर सांगलीतील वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर जमशेदपूर येथील झेवियर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट येथून एमबीए झाल्या. लीना नायर यांनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (नंतर बदललेले नाव युनिलिव्हर) या कंपनीत १९९२ साली मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामाला सुरुवात केली होती.२०१३ साली लीना नायर या लंडनला स्थायिक झाल्या. तिथे त्यांनी अँग्लो डच कंपनीच्या लंडन येथील मुख्यालयात नेतृत्व व संघटना विकास या विभागाच्या जागतिक उपाध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर त्यांना बढती मिळाली. युनिलिव्हर कंपनीच्या पहिल्या महिला सीएचआरओ बनण्याचा मान त्यांना मिळाला. जगातील सर्वात पॉवरफुल महिलांच्या फॉर्च्युन इंडियाच्या यादीतही लीना नायर यांचा समावेश आहे.
जगभर भारतीय सीईओंचा डंकाजगातील अनेक बड्या कंपन्यांच्या सीईओपदी भारतवंशीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीत सत्या नाडेला, ॲडोबमध्ये शंतनू नारायण, आयबीएमध्ये अरविंद कृष्णा, व्ही. एम. वेअरमध्ये रघु रघुराम व ट्विटरमध्ये पराग अग्रवाल हे सीईओ आहेत.