नवी दिल्ली : सार्वभौम सुवर्ण रोख्यांमधील (साॅव्हरिन गोल्ड बाँड) सरकारचा रस कमी होत चालला असून, यंदा फेब्रुवारीपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने सुवर्ण रोख्यांचा नवा हप्ता जारी केलेला नाही. नवीन रोखे न आल्यामुळे गुंतवणूकदारांकडे बाजारात ट्रेडिंग करून जुन्याच रोख्यांत गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. सरकार सुवर्ण रोखे घटवू शकते किंवा बंदही करू शकते, असे वृत्त गेल्या महिन्यात काही माध्यमांनी दिले होते.
सूत्रांनी सांगितले की, मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सुवर्ण रोख्यांचे ट्रेडिंग होते. रिझर्व्ह बँकेने दि. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी रोख्यांचा पहिला हप्ता जारी केला होता. आतापर्यंत ६७ हप्ते जारी करण्यात आले आहेत. या रोख्यांचे आतापर्यंत १४.७ कोटी युनिट्स जारी करण्यात आले आहेत. बीएसई आणि एनएसईच्या रोख सेगमेंटमध्ये सुवर्ण रोखे सूचीबद्ध आहेत. गुंतवणूकदार डीमॅट खात्याच्या माध्यमातून या रोख्यांची खरेदी-विक्री करू शकतात.
तरलता फारच कमी
सुवर्ण रोख्यांचा परिपक्वता कालावधी आठ वर्षांचा आहे. मात्र, या रोख्यांची बाजारातील तरलता (लिक्विडिटी) फारच कमी आहे.
वास्तविक, चांगली तरलता असेल, तरच रोख्यांना बाजारात चांगली किंमत मिळू शकते.
बीएसई आणि एनएसई या दोन्ही बाजारांत सुवर्ण रोख्यांचा ट्रेडेड व्हॉल्यूम १३.४ कोटी इतका होता.