Join us

केवळ Ayushman Yojnaच नाही, तर पेन्शन ते कर सूटीपर्यंत; देशात ज्येष्ठ नागरिकांना मिळताहेत 'या' सुविधा  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 12:34 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं बुधवारी ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचाराची मोठी भेट दिली. याशिवायही ज्येष्ठ नागरिकांना सरकारकडून अनेक सुविधा दिल्या जात आहे. पाहूया कोणत्या सुविधा देण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं बुधवारी ज्येष्ठ नागरिकांना मोफत उपचाराची मोठी भेट दिली. केंद्रानं आयुष्मान भारत योजनेत (Ayushman Bharat Yojna) ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश केला असून आता या वयोगटातील नागरिकांनाही कुटुंबाव्यतिरिक्त ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. परंतु, केवळ मोफत उपचारच नव्हे, तर पेन्शनपासून ते गुंतवणुकीवरील मोठ्या व्याजदरापर्यंत विविध योजनांअंतर्गत देशातील ज्येष्ठ नागरिकांना इतरही अनेक मोठ्या सुविधा मिळत आहेत.

वैद्यकीय सेवा

केंद्र सरकारच्या विशेष योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत (Ayushman Bharat Yojana) सरकारनं मोठा बदल करत ७० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्याची घोषणा केली आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या कुटुंबातील ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना स्वत:साठी दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त टॉप-अप कव्हर देण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा साडेचार कोटी कुटुंबातील सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. 

कोरोना, मोतीबिंदू सह कर्करोग, हृदयरोग आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजारांसह अनेक मोठ्या आजारांचा या योजनेत समावेश आहे. लाभार्थ्यांना देशभरातील २९,००० हून अधिक लिस्टेड रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल.

नियमित उत्पन्नाची हमी

नियमित उत्पन्नासह वृद्धापकाळात कोणतीही आर्थिक अडचण येऊ नाही, यासाठी सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व योजना राबवत आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजनेत एक विशेष योजना आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीवर ८.२ टक्के व्याज मिळते. दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलतही मिळते. एससीएसएस योजनेत केवळ १००० रुपये आणि जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक सुरू करता येते. 

जर एखाद्या व्यक्तीने ही कमाल मर्यादा म्हणजेच ३० लाख रुपये गुंतवले तर त्याला वार्षिक २.४६ लाख रुपये व्याज मिळेल आणि हे व्याज दरमहा पाहिले तर सुमारे २०,००० रुपयांच्या मासिक उत्पन्न असेल. यामध्ये ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्ती किंवा जोडीदारासोबत संयुक्त खातं उघडता येतं. याशिवाय अनेक योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना विशेष लाभ दिला जात आहे.

एफडीवर अतिरिक्त व्याज

बँकांमधील एफडी हा आजही गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय मानला जातो. अनेक बँकांनी आपल्या एफडीच्या दरात वाढ केली आहे. इतकंच नाही तर, ज्येष्ठ नागरिकांना यात अतिरिक्त व्याजही दिलं जातंय. खासगी आणि सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अतिरिक्त व्याज देतात.

पेन्शन योजना

विशेषतः वृद्धांच्या आर्थिक मदतीसाठी चालवण्यात येत असलेल्या पेन्शन योजनेबद्दल बोलायचं झालं तर देशात ओल्ड एज पेन्शन योजना कार्यरत आहे, ज्याचा लाभ ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृद्ध व्यक्तीला घेता येतो. या पेन्शन योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार संयुक्तपणे निधी देतात.

ITR भरण्यातून सूटप्राप्तिकर विभागाने वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला, ज्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत केवळ पेन्शन आहे, त्यांना आयटीआर भरण्यापासून सूट दिली आहे. नियमानुसार त्यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत पेन्शन आणि बँकेतील ठेवींवरील व्याज असावा. याशिवाय ज्या बँकेत पेन्शन येत आहे, त्या बँकेला सरकारनं अधिसूचित करणं आवश्यक आहे. 

टॅग्स :सरकारज्येष्ठ नागरिक